शिक्रापूर रोटरी क्लबच्या वतीने फेस शिल्डचे वाटप...

तळेगाव ढमढेरे,ता. २० एप्रिल २०२० (एन बी मुल्ला): रोटरी क्लब ऑफ शिक्रापूरच्या वतीने कोरोना रोगाच्या प्रतिबंधासाठी २४ तास कार्यरत असणारे शिक्रापूर व तळेगांव ग्रामीण रुग्णालयाचे सर्व आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर्स व शिक्रापूर पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी यांना फेस शिल्ड देण्यात आले.शिक्रापूर (ता.शिरुर) येथे आयोजित या कार्यक्रमात फेस शिल्डचे वाटप करण्यात आले. फेस शिल्डमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात येऊन होणाऱ्या प्रादुर्भावा पासून संरक्षण होण्यास मदत होणार आहे.


आत्तापर्यंत अशा प्रकारच्या एकूण ३०० शिल्ड वाटण्यात आल्या आहेत. रोटरी क्लब ऑफ शिक्रापुरने कायमच सामाजिक बांधिलकी जपत अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत. क्लब चे हे कार्य निश्चितच प्रशंसनीय आहे अशी प्रतिक्रिया याप्रसंगी शिरुर-हवेलीचे आमदार अ‍ॅड अशोक पवार यांनी व्यक्त केली. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष मयूर करंजे, सचिव प्रीतम शिर्के, संस्थापक अध्यक्ष वीरधवल करंजे, डॉ. मच्छिंद्र गायकवाड, डॉ. राम पोटे,  लद्धाराम पटेल, रवींद्र पाटील आदी उपस्थित होते.


शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉ काशीद, तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रज्ञा घोरपडे, पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांनी या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ शिक्रापुरचे कौतूक केले व कार्यकर्त्यांचे आभार मानले.या कार्यक्रमासाठी डॉ. श्रीकांत साकोरे व सचिन खेडकर यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे अध्यक्ष मयुर करंजे यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या