सादलगावची यात्रा रद्द...कोरोनामुळे गाव बंद

Image may contain: plant
सादलगाव,ता. २१ एप्रिल २०२० (संपत कारकुड): ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी गावच्या यात्रा-जत्रा तसेच धार्मिक उत्सव रद्द करण्यात आले असून गावोगावच्या ग्रामदैवतांचे धार्मिक उत्सव यंदा प्रथमच विना यात्रा साजरे केले जात आहेत. सादलगाव (ता.शिरुर) येथील ग्रामदैवत श्री बापूजी महाराज यांची यात्रा दि. २२ व २३ एप्रिल रोजी येत असून हे दोन्ही दिवस गावामध्ये जनता कर्फु घोषित केला आहे.


या दोन दिवसात देवाचे कोणतेही धार्मिक कार्यक्रम होणार नसून या दिवशी गावातील सगळे व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय झाला आहे. सध्या संचारबंदी असली तरी जत्रा म्हटले तर काही अतिउत्साही नागरिक देवाच्या नावाखाली गर्दी करण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामस्थांनी यात्रेदिवशी पोलीस बंदोबस्त मागून घेतला आहे. संचारबंदी मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची दवंडी गावात देण्यात आली आहे.


करोनाचा ग्रामीण भागात प्रभाव नसला तरी ग्रामीण भागात त्याचा शिरकाव होऊ नये. यासाठी प्रत्येकाने कडक नियम पाळले पाहिजे असे आव्हान सादलगावचे उपसरपंच देविदास होळकर यांनी यात्रेनिमित्त सर्वाना केले आहे.दरम्यानच्या काळात गावामध्ये  पुणे आणि इतर ठिकाणी स्थायिक झालेले परंतु गावकरी असलेले नागरिक गावी येण्याचे प्रमाण वाढले आहे. विशेष करून पुणे येथे मोठया प्रमाणात नागरिक नॊकरीनिमित्त स्थायिक झाले असून येथून गावात येणाऱ्यांचे प्रमाण जास्त आहे.


गावात नव्याने दाखल झालेले पुणेकर यांनी स्वतःहून आपली माहिती देणे गरजेचे असताना असे नागरिक अथवा गावकरी आपली माहिती लपवीत असलेमुळे गावामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. कोरोना संसर्ग पार्श्वभूमीवर आरोग्यविभाग, ग्रामपंचायत सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, यांनी योग्य ती काळजी घेण्याची मागणी नागरिक फोनद्वारे करीत आहेत. ग्रामीण भागात करोनाबाबत भीतीचे वातावरण असून नवीन येणाऱ्यांचे होम क्वारंटाईन करा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांनी केली आहे. 

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या