शिक्रापूरमधील करोना बाधित मृताच्या सासऱ्याचे पलायन...

शिक्रापूर, ता. 27 एप्रिल 2020: मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका व्यक्‍तीचा करोनामुळे गुरुवारी (ता. 23) रात्री मृत्यू झाला आहे. या मृत व्यक्‍तीसोबत राहणाऱ्या सासऱ्याला तपासणीसाठी रुग्णालयात नेले असताना त्याने ससून रुग्णालयातून शुक्रवारी (ता. 24) पलायन केले आहे. या व्यक्‍तीचा शोध सुरू असून, तो अद्याप सापडला नसल्याने परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.


शिक्रापूर (ता. शिरूर) येथील मलठण फाटा परिसरात राहणाऱ्या एका 40 वर्षीय व्यक्‍तीचा करोनामुळे ससून रुग्णालयात मृत्यू झाला आहे. या व्यक्‍तीसोबत राहणाऱ्या त्याच्या सासऱ्याला खबरदारी म्हणून तपासणीसाठी ससून रुग्णालयात नेण्यात आले होते, तर या रुग्णाने आधी उपचार घेतलेल्या शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील सहा डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना क्‍वारंटाइन करण्यात आले आणि सर्व डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय चाचणी घेण्यात आली. परंतु, यावेळी तपासणी पूर्वी मृत व्यक्‍तीच्या सासऱ्याने ससून रुग्णालयातून पलायन केले. त्यांनतर त्यांचा मोबाइल बंद झाला आहे. आरोग्य विभाग व प्रशासन या व्यक्‍तीची शोध घेत आहे. संबंधित व्यक्तीचा मोबाइल बंद आहे, आणि फोटो देखील उपलब्ध नसल्यामुळे शोध घेण्यात अडचणी येत आहेत.
दरम्यान, मृत करोनाबाधिताचा सासरा गेल्या तीन दिवसांपासून बेपत्ता असून, त्याला करोनाची लागण आहे की नाही हे माहिती नाही. जर ही व्यक्‍ती करोनाबाधित असेल अन्‌ लवकर सापडली नाही तर या व्यक्‍तीमुळे करोनाचा संसर्ग आणखी पसण्याची भीती आहे.


दिलासा...

करोनाबाधिताचा मृत्यू होण्याआधी त्याची तपासणी करणाऱ्या शिक्रापूर ग्रामीण रुग्णालयातील सहा डॉक्‍टर व कर्मचारी व रुग्णवाहिकेने ससून रुग्णालयात नेणाऱ्या रुग्णवाहिका चालकास क्‍वारंटाइन करीत त्यांची चाचणी केली. त्याचा अहवाल रविवारी (ता. 26) प्राप्त झाला असून, तो निगेटिव्ह आला आहे, असे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैजनाथ काशीद यांनी सांगितले. शिक्रापूरकरांसाठी ही दिलासादायक बातमी असली तरी नागरिकांनी सर्तक राहावे असे आवाहन प्रशासाने केले आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या