२०२० च्या अखेरपर्यंत कोरोनावर लस येणार...

No photo description available.
वाशिंग्टन, ४ मे २०२०: कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असुन आत्तापर्यंत जगभरात ३५ लाख रुग्ण कोरोना बाधित झाले असून मृतांचा आकडा २ लाख ४० हजार वर गेला आहे. सर्व जग कोरोनावर लस कधी येतेय म्हणून शास्त्रज्ञांकडे आतुरतेने पाहत आहे. याच दरम्यान कोरोनाची सर्वाधिक झळ बसलेल्या अमेरिकेने २०२० च्या अखेरपर्यंत यावर लस मिळेल असे म्हटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तसा दावा केला आहे, मात्र तोपर्यंत अमेरिकेत १ लाखांहून अधिक मृत्यू होण्याचा धोका आहे. सध्या अमेरिकेत ११ लाख रुग्ण असून मृतांचा आकडा ६८ हजाराहून अधिक झाला आहे.

'फॉक्स न्यूज'च्या एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले की, कोरोनावर लस तयार करण्याचे काम पूर्वीपेक्षा अधिक वेगाने सुरू आहे. या वर्षीच्या अखेरीस लस उपलब्ध होईल असा दावा ट्रम्प यांनी केला. आम्ही यासाठी पुरेपूर प्रयत्न करत आहोत. तसेच 'जॉनसन एंड जॉनसन' कंपनीचे नाव घेऊन ट्रम्प म्हणाले की, अनेक फार्मास्यूटिकल कंपन्या लस तयार करण्याच्या अगदी जवळ पोहोचल्या आहेत.

अमेरिकेत मृतांचा आकडा वाढणार...
देशातील मृतांचा आकडा पूर्वीच्या अंदाजापेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे, असेही ट्रम्प म्हणाले. कोरोनामुळे ७५ हजार ते १ लाख किंवा त्याहून अधिक लोकांचा मृत्यू होऊ शकतो. याआधी ट्रम्प यांनी ६० हजार लोकांचा मृत्यू होऊ शकतो असा अंदाज वर्तवला होता.मात्र सद्यस्थितीत अमेरिकेत मृतांची संख्या ६८ हजारांच्या वर गेली आहे.

ट्रम्प यांचा दावा शास्त्रज्ञांच्या विधानाशी उलट...
अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऍलर्जी अँड इंफेक्शियस डिसीजचे संचालक डॉ. एंथनी फॉसी यांनी कोरोनाची लस तयार होण्यास जानेवारी महिना उजाडू शकतो असे म्हंटले आहे. जोपर्यंत कंपनी लसीची चाचणी करत नाही आणि त्याला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत त्याचे उत्पादन सुरू करणे शक्य नाही. तसेच अमेरिकेच्या आरोग्य विभागाने देखील कोरोनावरील लस तयार होण्यास १८ महिन्यांचा कालावधी लागू शकतो असे म्हंटले आहे. साधारणपणे एखाद्या आजारावर लस तयार।करून ती बाजारात उतरवूपर्यंत अनेक वर्षे लागतात.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या