शिरूर तालुक्‍यातील सर्वच गावे 'रेड झोन'मध्ये...

शिरूर, ता. 9 मे 2020: जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घालायला सुरवात केली असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 17 मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. मात्र, दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतानाच दिसत आहे. शिरूर तालुक्‍यातही आत्तापर्यंत "कोरोना'चे पाच रुग्ण आढळल्याने शहरासह तालुक्‍यातील सर्व गावांचा "रेड झोन'मध्ये समावेश करण्यात आला आहे. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे या गावांचा परिसर 'प्रतिबंधित क्षेत्र' म्हणून जाहीर करण्यात आला आहे.प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, गटविकास अधिकारी बाळासाहेब ढवळे पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. तुषार पाटील, कृषी अधिकारी राम जगताप, नायब तहसीलदार श्रीशैल व्हट्टे यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या बैठकीत खबरदारीच्या उपाययोजनांचे नियोजन करण्यात आले आहे. चार कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याने शिक्रापूर, तळेगाव परिसर "कंटेनमेंट झोन' जाहीर झाला असून, तेथे निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. या परिसरातील दवाखाने व औषध दुकानांबरोबरच; सर्व आस्थापना बंद राहतील, असे प्रांताधिकारी देशमुख यांनी सांगितले. महसूल, पोलिस, सामान्य प्रशासनांना परिपत्रकाद्वारे; तर लोकांना दवंडीद्वारे सूचना दिल्याचे ते म्हणाले. पुणे जिल्हा "रेड झोन'मध्ये असल्याने शिरूरमधील सर्व गावे याच झोनमध्ये येतात, असे तहसीलदार शेख यांनी सांगितले.
दरम्यान, ऑनलाइन शिक्षणाला मात्र सूट आहे. लग्नसमारंभासाठी पन्नास लोकांना "सोशल डिस्टन्सिंग'सह इतर अटी व शर्तीसह परवानगी आहे; तथापि, प्रतिबंधित क्षेत्रात सायकल, रिक्षा, मोटारींवर बंधने आहेत. अंत्यविधीला वीस जणांनीच उपस्थित राहावे. या नियम व अटींचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. शिवाय, सद्यःस्थितीत, सार्वजनिक बस वाहतूक, शाळा, कॉलेज, क्‍लासेस, चित्रपट गृह, शॉपिंग कॉम्प्लेक्‍स, व्यायामशाळा, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, उद्याने, सभागृह व थिएटर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील. राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व धार्मिक कार्यक्रम, खेळ, मेळावे, मनोरंजनाचे सोहळे यावरही बंदी असून, पूजापाठ, प्रार्थनेसाठीची ठिकाणे नागरिकांना बंद आहेत, असेही तहसीलदार लैला शेख यांनी सांगितले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या