शिरूरला 5 दिवस जनता कर्फ्यू; बाहेर पडू नका...

शिरूर, ता. 16 मे 2020: शिरूर तालुक्यात कोरोना रुग्ण सापडू लागल्यामुळे आणि विविध भागांमधून येथे नागरिक येत असल्यामुळे शिरूर शहरामध्ये आजपासून (शनिवार) पाच दिवस "जनता कर्फ्यू' पाळण्यात येणार आहे.

शहराच्या सर्व स्तरांतील नागरिकांशी विचारविनीमय करून हा निर्णय झाला आहे, अशी माहिती नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली. या कालावधीत केवळ दवाखाने व त्याजवळचे मेडिकल स्टोअर चालू राहतील. इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
कारेगाव (ता. शिरूर) येथील कोरोनाबाधित महिलेच्या संपर्कात येथील दोघे आल्याचे, तसेच निघोज (ता. पारनेर) येथील बाधितांचे काही नातेवाईक येथे असल्याचे समजल्याने शहरात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
सणसवाडीत 24 मार्चला पहिला रुग्ण आढळला. शिक्रापूर, तळेगाव ढमढेरे परिसरात सात कोरोनाबाधित आढळले. त्यांच्या संपर्कातील बहुतांश जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असले; तरी दोघांचा मृत्यू झाल्याने व इतरांवर अद्याप उपचार चालू असल्याने भीतीचे सावट कायम आहे. तालुका रेड झोनमध्ये असूनही फारशी खबरदारी घेतली जात नसल्याचे चित्र आहे. फळे, भाजीपाला विक्रेत्यांचा राबता सर्वच भागात असून, बायपासला रोज संध्याकाळी भाजीपाल्याची घाऊक खरेदीविक्री होते. तेथे किमान 25 मोठी वाहने येतात. व्यवहारावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडताना दिसत आहे.
शिरूर शहरात जाणाऱ्या रस्त्यांवर लावलेले बांबू ट्रक, टेम्पो चालकांनी धडक मारून तोडले असून, तपासणी नाक्‍यांवरील पोलिस आठ दिवसांपासून गायब झाले आहेत. त्यामुळे शहरात "आओ जाओ घर तुम्हारा' असेच चित्र आहे. अधिकाऱ्यांत कुठलाही ताळमेळ राहिलेला नसून, परप्रांतीयांना त्यांच्या प्रांतात पाठविणे एवढ्या एकाच कामांत सर्व अधिकारी गुंतल्याने इतर समस्या व कामे होत नसल्याचा स्थानिकांचा आरोप आहे.
कारेगावची ऐंशी वर्षीय महिला कोरोनाबाधित झाल्याने गाव बंद करण्यात आले. आरोग्य पथक गावात दाखल झाले असून, संबंधित महिलेच्या कुटुंबीयांबरोबरच; त्यांच्या संपर्कातील 31 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. डी. शिंदे यांनी सांगितले. कारेगावातील महिलेचे नातेवाईक शिरूर येथील बाबूराव नगर परिसरात राहात असून, ते त्यांच्या संपर्कात होते. तसेच, त्याच परिसरातील रुग्णालयात त्यांना नऊ मे रोजी दाखल करून एक दिवस उपचारही चालू होते. त्यामुळे नातेवाइकांसह संबंधित रुग्णालयातील 18 जणांच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या पार्श्‍वभूमीवर, नगर परिषदेत तातडीने विचारविनिमय झाला. शहराच्या सर्व स्तरातील लोकांशी विचारविनिमय करून उद्यापासून (ता. 16) पाच दिवस गाव बंद ठेवण्याचा निर्णय झाला असल्याचे नगर परिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी सांगितले. या कालावधीत केवळ दवाखाने व त्याजवळचे मेडिकल स्टोअर चालू राहतील. इतर सर्व आस्थापना, दुकाने बंद राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या