दादा-वहिनीने उचलली गावाची अशी 'जबाबदारी'!

रांजणगाव गणपती, ता.२१ मे २०२० (प्रतिनिधी): सध्या संपुर्ण जगात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला असुन भारतातही या विषाणूचा संसर्ग वाढत आहे.त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग आपल्या शरीराला होऊ नये.यासाठी प्राणायाम, योगासनं याद्वारे शरीराची प्रतिकारशक्ती चांगली राहील तसेच आपले आरोग्य उत्तम राहील यासाठी प्रत्येकजण काळजी घेत आहे.


कोरोनाच्या पार्श्वभुमीवर गावाबाहेर राहून राज्याची सेवा करत असताना शिरुर तालुक्यातील गणेगाव (खालसा) या गावचे सुपुत्र व नाशिकचे पोलिस उपायुक्त अमोल तांबे तसेच त्यांच्या पत्नी नाशिक महानगरपालिकेच्या उपायुक्त अर्चना तांबे हे दांपत्य आपल्या गावातील नागरिक सुद्धा सुरक्षित राहावेत.या भावनेतून प्रयत्न करत असुन त्यांनी  आपल्या गावातील प्रत्येकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी म्हणून गावातील प्रत्येकासाठी होमिओपॅथी औषध पाठवले आहे.जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून, त्यावर निर्बंध घालण्यासाठी वेगवेगळ्या पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. 'अयुष' मंत्रालय - भारत सरकार यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी होमिओपॅथीचे 'Arsenic Album 30' हे औषध रोगप्रतिबंधक उपचार म्हणून घेण्यासाठी सुचविले आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून कोविड- 19 या आजाराची लागण होण्याची शक्यता कमी असते. १ वर्षाच्या वयापुढील सर्वजण हे औषध घेऊ शकतात.


कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरामध्ये तांबे दांपत्य अहोरात्र काम करत आहे. त्यांच्या कामाची दखल खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली असून, ट्विटरवरून त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे. लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर गावातील गरीब नागरिकांना किमान २ महिने पुरेल एवढ्या किराणा साहित्याचे वाटप अमोल तांबे यांचे वडील श्रीधर व बंधू महेश तांबे यांनी केले आहे. शिवाय, रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर गावातील मुस्लिम बांधवांना सुका मेवा भेट म्हणुन  दिला आहे.

No photo description available.

गणेगाव (खालसा) या गावची लोकसंख्या २५०० एवढी आहे. गावातील प्रत्येकासाठी होमिओपॅथीचे औषध अमोल व अर्चना तांबे यांनी नाशिक येथून पाठवून दिले आहे. यासाठी नाशिकचे डॉ. अशर शेख यांनी मदत केली. गावचे सरपंच दत्ता पिंगळे यांच्या ताब्यात औषध देण्यात आले असुन ग्रामपंचातीच्या वतीने नागरिकांना औषध दिले जात आहे. शिवाय, गावातील युवकांचा एक गट तयार करून प्रत्येकाच्या घरी जाऊन औषध दिले जात आहे. राज्यातील विविध शहरांमधील नागरिकांना औषधे दिली जातात. पण, एखाद्या गावामधील १०० टक्के नागरिकांना औषध दिल्याची ही पहिलीच घटना आहे.


याबाबत www.shirurtaluka.com शी बोलताना अमोल तांबे म्हणाले, 'गावापासून दूर असलो तरी गावची नाळ कधी तुटत नसते. गावातील नागरिक आपल्यावर प्रेम करत असतात. त्या प्रेमापोटीच त्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. गावातील प्रत्येकासाठी औषध पाठविले असुन, ते ५ महिने पुरणार आहे. या औषधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढून गावातील नागिरक कोरोनापासून नक्कीच दूर राहतील. प्रत्येकानेच आपल्या गावासाठी थोडे-फार प्रयत्न केले तरी आपण कोरोनाला नक्कीच परतवू शकतो.


प्रशासकीय सेवेत मोठ्या पदावर असलेले तांबे दांपत्य एक वर्षापासून गावात येऊ शकले नाही. पण, गावाबाहेर राहून सुद्धा गावातील प्रत्येकाची ते आपुलकीने काळजी घेताना दिसतात. गावाला त्यांचा अभिमान असून, त्यांचे कौतुक केले जात आहे.

Comment Box is loading comments...

संबंधित बातम्या