गुनाट येथील दत्त मंदिर...

गुनाट येथील दत्त मंदिर हे पुरातन काळापासून असून पांडव काळातील आहे. गुनाट येथील स्वामी बाळानंद महाराज हे वाघुंडे (ता. पारनेर) येथे असलेल्या दत्त मंदिराची पुजा करून दररोज गुनाट येथे म्हणजे जवळपास ४० किमी अंतर ते ये-जा करीत होते. दत्त प्रभू स्वामी बाळानंद महाराजांची भक्ती पाहुन प्रसन्न झाले व ते एके दिवशी स्वामी बाळानंद वाघुंडे येथील दर्शन घेऊन येत असताना दत्त प्रभू त्यांच्या पाठोपाठ गुनाट येथे आल्याची ख्याती ऐकण्यात येत आहे.


 येथे पांडवकालीन मंदिर असून फार जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्धीस आलेले आहे. या मंदिराशेजारी एक विहीर असून, संपूर्ण गाव या विहिरीचे पाणी पित होते १९७२ च्या भीषण दुष्काळात सुध्दा या विहिरीचा तळ दिसून आला नाही. गावातील  ग्रामस्थांना ७२ सालच्या दुष्काळात ही पाणी टंचाई जाणवली नाही. सदर विहिरीतून दत्त जयंतीच्या वेळेस देव जन्म झाल्यानंतर कळशी निघत होती. सलग तीन वर्षे कळशी निघाल्याबाबतची माहिती ग्रामस्थ देत आहेत.

दत्त मंदिराच्या चार ही बाजूने मातीच्या पंरतु दोन हात जाडीच्या भिंती होत्या. काही वर्षांपूर्वी पुर्व दिशेच्या भिंत पाडून नवीन दगडाच्या तोडीची भिंत बांधण्यासाठी पायाचे खोदण्याचे काम चालू असताना मातीची भिंत दोन व्यक्तींच्या अंगावर पडली. भिंतीची उंची जवळपास १५ फूट होती, ढिगाऱ्याखाली दोन व्यक्ती अडकल्याने त्यांना गावकऱ्यांनी बाहेर काढण्यासाठी पराकाष्ठा केली व अडीच तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात यश आले. त्यावेळी दोन्हीही व्यक्तींना साध खरचटलेले सुध्दा नव्हते, हा दत्ताचा महिमा असल्याचे दत्त भक्त बबनराव करपे यांनी सांगितले.

दत जयंती निमित्ताने गावात गेली २४ वर्ष सातत्याने अंखड हरिनाम सप्ताह मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परिसरात या कार्यक्रमाचे तोंड भरून कौतुक होताना दिसत आहे. दत्त मंदिरात दर गुरुवारी भजन व आरती होते. सकाळी ८ वाजता, दुपारी १२ व संध्याकाळी ५ वाजता नित्यनियमाने आरती होते. सकाळी आरती झाल्यानंतर खिचडी प्रसाद म्हणून वाटप केली जाते. दुपारी साबुदाणा चिवडा व संध्याकाळची आरती झाल्यानंतर चपाती वरण व ठेचाचा प्रसाद दिला जातो. दर पौर्णिमेला सुध्दा आरती मंदिरात होते.

मंदिर पुरातन काळातील असल्याने जीर्ण झाले म्हणून ग्रामस्थांनी मंदिराचे जीर्णोद्धार करण्याचे ठरविले व त्यानुसार २६ मार्च २०१७ या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीला काम सुरू केले आहे. मंदिराच्या जीर्णोद्धार हा जवळपास १ कोटी ३५ लाख रूपये खर्च करून करण्यात येणार आहे. ६८ फूट लांब व ४४ फूट रुंदीचा सभामंडप व ४० फूटी उंचीचा कळस करण्याचे योजिले आहे. सध्या काम प्रगती पथावर असून सभामंडपाचे काम पुर्ण झाले आहे. या कामासाठी स्वच्छेने देगण्या येत आहेत. मंदिराचे काम चालू असताना संन्यासीच्या समाधी आढळून आल्या आहेत. त्या समाधी ज्या ठिकाणी होत्या त्याच ठिकाणी विधी पुर्वक कार्यक्रम करून ठेवण्यात आल्या आहेत. शिरूर तालुक्यातील एकमेव भव्य दिव्य दत्त मंदिर होणार असल्याची चर्चा परिसरात आहे. गुनाट येथे दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक भक्त येत असतात. गावकर्‍यांनी शासन दरबारी पाठपुरावा करून या मंदिरास तीर्थक्षेत्र 'क' दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
Comment Box is loading comments...

आणखी >>

श्री क्षेत्र रामलिंग

प्रभू श्री रामचंद्र यांना ज्या वेळी वनवासाला पाठवले त्या वेळचा रामलिंगचा इतिहास आहे. श्री रामचंद्र ज्या वेळी वनवासाला होते त्यावेळी त्यांचा दिनक्रम ठरलेला असायचा. दिवसभर पायी चालायचे व रात्री मुक्काम करायचा. रात्री जेथे मुक्काम करायचा तेथे वाळूची पिंड बनवायची व सकाळी सूर्योदयाच्या अगोदर ती पिंड शेजारील नदीत विसर्जित करायची, असा दिनक्रम ठरलेला.नित्यक्रमाणे आत्ता जेथे रामलिंग क्षेत्र आहे तेथे रामचंद्राने रात्री मुक्कामाच्या वेळी पिंड बनवली होती. श्री राम जेथे मुक्कामाला थांबले होते तेथे सुर नावाच्या ऋषींचा आश्रम होता. ऋषीबरोबर गाठभेट झाल्याने संपूर्ण रात्र गप्पा मारण्यात गेली व नेमकी सूर्योदयाच्या वेळेस श्री रामचंद्र यांना गाढ झोप लागली. सूर्योदयाच्या अगोदरचा पिंड विसर्जनाचा दिनक्रम राहून गेला. नियमाप्रमाणे पिंड सूर्योदयाच्या अगोदर विसर्जित करायची असल्याने श्री राम यांनी सुर्योदायानंतर ती विसर्जित केली नाही. ठरल्याप्रमाणे पुढील प्रवासास ते निघाले. तयार केलेल्या पिंडीची व्यवस्था सुर ऋषींकडे सोपवली, म्हणून त्या पिंडीस रामलिंग असे नाव पडले. पुढे त्याचेच रामलिंग मंदिर झाले. या मंदिरामुळे पुढे हे क्षेत्र श्री क्षेत्र रामलिंग या नावाने नावरुपास आले.प्राचीन काळी रुर नावाच्या राक्षसाने शंकराची उपासना करून शंकराला प्रसन्न करून घेतले होते. शंकर प्रसन्न झाल्यामुळे रुर राक्षसाने धुमाकूळ घालायला सुरवात केली. रुर राक्षसाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी देवाचा धावा केला. या राक्षसामुळे देवांना सुद्धा चिंता पडली. त्यातच भर नारदमुनिंनी रुर राक्षसाला कळ लावली. नारदमुनींनी या रुर राक्षसाची वारेमाप स्तुति केली व त्या राक्षसाला देवांचे राज्य घेण्यास सांगितले. नंतर त्याने देवांवर स्वारी करायला सुरुवात केली. रुर राक्षसाने देवांना फार त्रास दिला. मग सर्व देवदेवता घाबरून देवाधिदेव महादेवाकडे गेले. देवांनी शंकराला प्रसन्न केले. परंतु शंकरापुढे एक अडचण होती. रुर राक्षस हा शंकराचा भक्त होता, यामुळे शंकर आपल्या भक्तावर शस्त्र उचलू शकत नव्हते. यातून शंकराने एक मार्ग काढला, शंकराच्या जटेतून एक शांती नावाची देवी निघाली होती. सर्व देवतांनी तिला प्रसन्न केली व शंकराच्या आज्ञेवरून शांती नावाच्या देवीने बाकी देवांना दिलासा दिला व रुर राक्षसास मारण्याचे वाचन दिले. शांतीच्या डोळ्यातून ज्वालाच-ज्वाला बाहेर पडू लागल्या व तोंडातून हजारो डाकिण्या बाहेर पडल्या. रुर राक्षसाचा पराभव झाला. रुर राक्षस पळून गेला. देवीने त्याचा पाठलाग केला व सडपा जेथे शिरुर गाव आहे या गावाच्या वेशीवर राक्षसाला गाठले व त्याचा वध केला. म्हणून त्या गावास शिवरूर असे नाव पडले व पुढे शिवरूरचेच शिरुर असे नाव झाले, असे सांगितले जाते.

रामलिंग क्षेत्र हे शिरूर शहरापासून पाबळ रस्त्यावर ३ किलोमीटर अंतरावर आहे. तेथे जाण्यासाठी एसटी सेवा व खाजगी रिक्षा उपलब्ध आहेत. दरवर्षी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. शिवाय, श्रावणी सोमवारी भाविक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.
Comment Box is loading comments...

आणखी >>

संबंधित लेख