वाचन हेच जीवनशिक्षण...

अनेक पुस्तकातलं एक-एक पुस्तक, एका पुस्तकातलं एक प्रकरण, प्रकरणातलं एक पान, परिच्छेद आणि ओळ व शब्द आपल्या जीवनाला दिशा दिल्या शिवाय राहत नाही. आपण म्हणतो जो वाचणार नाही तो वाचणार नाही.

१५ ऑक्टोबर राष्ट्रपती स्व. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस. संपूर्ण देशभर "वाचन प्रेरणा दिवस" म्हणून साजरा होत आहे. चौफेर वाचनाने रोज एखादा नवा विचार, कल्पना किंवा विषयांचे भावविश्व अंतःकरणात तयार होते. या स्वगत मनाच्या आंदोलनांना साहीत्य आणि विज्ञानात प्रकट करताना हृदयस्थ विचारांचा अभिषेक पूर्णत्वास जातो इतकी प्रचंड शक्ती 'वाचनात' आहे.

आजकाल फक्त पाहणेच वाढले आहे, वाचन कमी झाले आहे. तासनतास मोबाईल, टिव्ही, फेसबुक, व्हॉट्सअप पाहणे सुरु आहे. पाहणेही फार चुकीचे आहे, अशातला भाग नाही. पण विवेक बुद्धीने पाहावे आणि प्रगल्भ विचारांनी वाचले पाहीजे. जे उघड्या डोळ्यांनी पाहतो ते आवडेल असे नाही पण वाचनाने "हंसशील न्यायाने "जे हवे ते घ्यावे बाकी सोडून द्यावे असा विवेक जागृत होतो.

शालेय शिक्षणा पासून पदव्युत्तर शिक्षणा पर्यंत, कृषी क्षेत्रापासून तंत्रज्ञानापर्यंत आपण प्रगतीचे पंख पसरले आहेत. परंतु, मन प्रसन्न करणारे एखाद तरी शो-केस पुस्तकांच ठेवा. "हमारे घर में टि सेट है, कॉफी सेट है, सोफा सेट है, डायनींग सेट है लेकीन शेठ अपसेट है ।"
सर्व सेट आहेत पण जीवनाच व्यासपीठ अपसेट का ?
आपल्या व्यक्तीगत व चौफेर व्यक्तीमत्वासाठी चौफेर वाचन केले पाहीजे. वाचना शिवाय जीवनात पूर्णता नाही, सखोल वाचना शिवाय पुर्तता देखील येऊ शकत नाही. प्रचंड अशी शक्ती या वाचना मध्ये आहे.

लोकमान्य टिळकांनी मंडालेच्या तुरूंगातल "गीतारहस्य" आपल्याला दिले, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "माझी जन्मठेप" अत्यंत हृदयस्थ भावनेने रेखाटले, नेहरुंचे 'डिस कव्हरी ऑफ इंडिया, गाधीजींचे 'सत्याचे प्रयोग, बाबासाहेबांचे 'भारतीय संविधान' ज्ञानेश्वरी, गाथा, रामायण, महाभारत ..
अलीकडच्या काळात मृत्यूंजय, छावा, स्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अमृतवेल, एक होता कार्व्हर अशी कित्येक महत्वपूर्ण पुस्तके आपल्या जीवनाला कलाटणी देणारी आहेत. त्याचे एखाद तरी पान आपण वाचूया...

वाचनातून संस्कार निर्माण होतात. वाचन आणि संस्कृती यांचं फार जवळच नात आहे. वेदांपासून - माहिती तंत्रज्ञानापर्यंत जी क्रांती झाली ती पुस्तक रुपाने वाचायला, अनुभवायला मिळते आहे. ग्रंथ हा अडीच अक्षरांचा शब्द, पुस्तक हा साडेतीन अक्षरांचा शब्द, साऱ्या विश्वाच ज्ञान, जिज्ञासा, माहिती, संस्कार आणि संस्कृती या पुस्तका मध्ये असते. नोव्होने असे म्हटले आहे की, जुना कोट घाला पण नवीन पुस्तक विकत घ्या. नवीन पुस्तक विकत घेण्यात बंगाल आणि केरळचा नंबर लागतो. आता मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरातही ही चळवळ अग्रभागी आहे.

अनेक पुस्तकातलं एक-एक पुस्तक, एका पुस्तकातलं एक प्रकरण, प्रकरणातलं एक पान, परिच्छेद आणि ओळ व शब्द आपल्या जीवनाला दिशा दिल्या शिवाय राहत नाही. आपण म्हणतो जो वाचणार नाही तो वाचणार नाही, जो वाचेल तो टिकेल वगैरे, वगैरे... वस्तुस्थिती पहा, संगणक साक्षर-निरक्षर याबाबत ई-मेल वाचा, फॅक्स वाचा, ट्विट वाचा... या प्रत्येकातून आपल्याला वेगळ्या कल्पना मिळतील.

ध्येयवेडा माणूस निर्माण करण्याची शक्ती वाचना मध्ये आहे. आपले चरित्र आणि चारित्र्य संपन्न करण्याची शक्ती वाचना मध्ये आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना अपेक्षित मानवतेचा, राष्ट्रप्रेमाचा विचार रोजच्या वाचनाने करूया. एक वेगळी पहाट, मानवता निर्माण करणारा संदेश "वाचन प्रेरणा दिना" निमित्ताने स्वीकारून पुढे जाउया...

Title: principal ramdas thite write apj abdul kalam wachan prerna d
प्रतिक्रिया (1)
 
Abhijit kedari
Posted on 16 October, 2020

A.p.j abdul kalam

तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे