शिरुर तालुक्यातील पत्रकाराला शिवीगाळ करणे पडले महागात, अखेर एसटी कर्मचाऱ्याचे निलंबन

मुख्य बातम्या शिरूर तालुका

आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी केली कारवाई

शिरूर (तेजस फडके): शिरूर बस स्थानकामध्ये बातमी घेण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला तेथे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याने बातमी घेण्यापासून रोखून शिवीगाळ करत दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना एसटीच्या वर्धापनदिनी १ जुन रोजी घडली होती.

शिरूर पोलीस स्टेशन येथे एसटी चालक शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्यावर कलम ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यासाठी पत्रकार संघटनेने लेखी पत्र शिरूर पोलिस स्टेशन व बसस्थानक आगारप्रमुखांना दिले होते. त्यामुळे या कर्मचाऱ्याला पत्रकाराला शिवीगाळ करणे चांगलेच महागात पडले असून शिरूरचे आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी सदर घटनेची खाते अंतर्गत चौकशी करून शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याचे निलंबण केले आहे. तू पत्रकार आहेस मला माहित आहे वारंवार तू काड्या करतोस बातम्या देतोस. तू आता बातमी घेण्यासाठीच आला आहे. तू इथून निघून जा नाहीतर मार खाशील. अशा पद्धतीची भाषा वापरून पूर्ण पणे दारूच्या नशेत असलेल्या शांताराम दौंडकर याने पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली होती.

याबाबत शिरूर तालुक्यातील पत्रकारांच्या वतीने व महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ शिरूर तालुका यांच्या वतीने शिरूरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत व आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांना कारवाई करण्यासाठी लेखी निवेदन देण्यात आले होते. शिरूरचे आगार प्रमुख भैरवनाथ दळवी यांनी सदर घटनेची खाते अंतर्गत चौकशी करून शांताराम दौंडकर या कर्मचाऱ्याचे निलंबण केले असल्याने यापुढे प्रवाशांना उद्धट भाषा वापरणा-या व उलट उत्तर देणाऱ्या कर्मचाऱ्यांना वचक बसणार आहे.

“पत्रकारांना बाचाबाची आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी चालक शांताराम दौंडकर यांची चौकशी करून एसटी महामंडळाच्या शिस्त व अपिलीय कार्यपद्धतीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.”

भैरवनाथ दळवी

प्रभारी आगार प्रमुख शिरूर

बातमी घेण्यासाठी गेलेल्या आमच्या सहकाऱ्याला एसटीच्या चालकाने दारुच्या नशेत शिवीगाळ करत बाचाबाची केली होती, याप्रकरणी सर्वानी एकत्र येत आगार प्रमुख, पोलीस प्रशासन याकडे रितसर तक्रार केली होती, त्यानुसार आगार प्रमुखांनी त्याची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली.

सचिन धुमाळ, पुणे जिल्हा अध्यक्ष महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ

आगारप्रमुखांनी केलेल्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. दारू पिऊन पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्याला या कारवाईमुळे चांगलीच चपराक बसली आहे. हा पत्रकार एकजुटीचा विजय आहे. सरकारी कर्मचाऱ्याने नागरीकांशी चांगले वर्तन केले पाहीजे.

अरूणकुमार मोटे, पुणे विभागीय सदस्य, महाराष्ट्र राज्य पत्रकार महासंघ