शिरुर येथे TDM सिनेमाला पाठिंबा देण्यासाठी आज ट्रॅक्टर मोर्चा 

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): निर्माते-दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या बहुचर्चित टीडीएम या मराठी चित्रपटाला थिएटरमध्ये प्राईम टाईम मिळावा व रेग्युलर शो मिळावेत या मागणीसाठी शिरूर मधील चित्रपट रसिक व भाऊराव प्रेमी मित्र मंडळाच्या वतीने आज शनिवार दुपारी 4 वाजता शिरुर येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे.

28 एप्रिल रोजी टीडीएम हा मराठी चित्रपट पुण्याह महाराष्ट्रात धडाक्यात प्रदर्शित झाला होता. परंतु चारच दिवसांत अनेक प्रतीथयश चित्रपटगृहांमधून अचानकपणे हा चित्रपट काढून टाकण्यात आला. तर अनेक चित्रपटगृहांनी या चित्रपटाला प्राईम टाईम नाकारला. यामुळे खचलेल्या भाऊराव कऱ्हाडे व चित्रपटातील कलाकारांनी टोकाचा निर्णय जाहीर केला. या पार्श्वभूमीवर शिरुर मधील भाऊराव कऱ्हाडे यांची मित्रमंडळी आणि समर्थक एकवटले असून त्यांनी कऱ्हाडे यांच्या पाठीशी उभे राहताना चित्रपटाला पाठिंबा दर्शविला आहे.

याच पार्श्वभूमीवर नुकतीच शिरुर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत याबाबतच्या आंदोलनाची माहिती देण्यात आली. उमेश शेळके, रुपेश घाडगे, अविनाश घोगरे, योगेश महाजन,शिवम पाठकजी, नितीन अवचार,अनघा पाठकजी, रेश्मा शेख आदी यावेळी उपस्थित होते.

आज शनिवार (दि 6) मे रोजी दुपारी 4 वाजता शिरुर येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन मोर्चाला सुरुवात होईल. तर तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चाची सांगता होईल. यावेळी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांना मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे. टीडीएम चित्रपटाला थिएटरमध्ये रेग्युलर शो मिळावेत व प्राईम टाईम मिळावा आदी या आंदोलनाच्या प्रमुख मागण्या असल्याचे उमेश शेळके यांनी सांगितले. आपल्याला आपापल्या परिसरातील ट्रॅक्टर व ढोल-ताशांसह या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. या मोर्चात चित्रपटांमधील कलावंतही सहभागी होणार असून महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अनघा पाठकजी व रेश्मा शेख यांनी केले आहे.