दिवाळी गोड करत वंचित घटकांच्या दारात दीप प्रज्वलन

शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सगळीकडे दिवाळीनिमित्त दारोदारी दीप प्रज्वलित केले जातात. मात्र आपल्या दारात दीप प्रज्वलित करतानाच आर्थिक दुर्बलतेमुळे जीवनच अंधकारमय झालेल्या वंचित घटकांच्या दारातही दीप प्रज्वलित करून त्यांची दिवाळी गोड करण्याचा स्तुत्य उपक्रम रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि स्व गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांच्यावतीने राबवण्यात आला.

आपले अंगण दिव्यांनी उजळत असताना याचा थोडासा प्रकाश वंचित घटकांच्याही दारी पडावा आणि त्यांनाही दिवाळी सणाचा आनंद घेता यावा. या हेतूने रामलिंग महिला संस्था गेली अनेक वर्षांपासून अशा वंचित घटकांच्या बरोबर दिवाळी साजरी करत आहेत. याही वर्षी रामलिंग महिला संस्था तसेच स्व.गणेश गौतम घावटे पाटील युवा मंच यांनी रामलिंग येथील भिल्ल वस्ती मध्ये जाऊन त्यांच्या समवेत दिवाळी साजरी केली. तेथील मुलांना नवीन कपडे तसेच महिलांना नवीन साडीचोळी तसेच मिठाई व जीवनावश्यक वस्तू देऊन त्यांचा आनंद द्विगुणित करण्याचा प्रयत्न केला.

आर्थिक दुर्बलतेमुळे हे घटक वर्षभरातील बहुतांशी सर्वच सण उत्सवांच्या आनंदापासून वंचित राहतात. रामलिंग महिला संस्था या घटकांना नेहमीच विविध सण उत्सवाचा आनंद देण्यासाठी पुढाकार घेताना दिसतात. या दिवाळीनिमित्तही या संस्थेने त्यांच्या प्रति दाखवलेल्या संवेदना पाहून भिल्ल वस्ती मधील नागरिक भारावून गेले. डोळ्यांमधील अश्रूंना वाट करून देताना या संस्थेचे व घावटे युवा मंचचे त्यांनी मनापासून ऋण व्यक्त केले.

यावेळी रामलिंग महिला संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डिले म्हणाल्या, ज्यांना दोन वेळेचे अन्न मिळवण्याची कायमच भ्रांत असते,त्यांच्या नशिबी कसला सण उत्सव. समाजातील सक्षम घटकांनी सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून अशा घटकांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.आमची संस्था याच जाणीवेतून या घटकांसाठी विविध उपक्रम राबवित आहे.

यावेळी महिला दक्षता समिती सदस्य श्रुतिका झांबरे,छाया हारदे,राष्ट्रवादी महिला तालुका उपाध्यक्षा – दिपाली आंबरे,इतर महिला मान्यवर उपस्थित होत्या.