वाळूच्या जागी क्रशसँड आलीच कशी याचा काहीच लागेना मेळ...?

शिरुर तालुक्यात महसुल आणि पोलीसांचा नक्की काय चाललाय खेळ...?

२२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या एका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या निमित्ताने हे प्रकरण पुढे आले आणि पुढे इतके रंजक होत गेले की वाळू चोरीची प्रकरणे हाताळण्यात सराईत झालेल्या पोलिस आणि महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी सरळ-सरळ दोन्ही खात्याची इज्जत वेशीवर टांगली आहे.

शिरुर: शिरुर तालुक्यात सध्या महसुल आणि पोलीस प्रशासन यांच्यात काहीच ताळमेळ राहिलेला नसुन गेल्या आठवडाभरात महसुल व पोलीस या दोन्ही खात्यातील काही चुकीच्या अधिकाऱ्यांमुळे दोन्ही खात्यांची पुरती बेअब्रू झाली आहे.

शिरुर तालुक्यात सध्या गाजत असलेल्या महसूलच्या वाळू प्रकरणाबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. शिक्रापूर पोलीस स्टेशन मधील क्रशसँड प्रकरणात महसूल विभागाने तपासाला गती घेतली आहे .पोलिस प्रशासनाकडून या प्रकरणी उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्याकडून तपास सुरु आहे. २२ जुलै रोजी स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेल्या एका बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरच्या निमित्ताने हे प्रकरण पुढे आले आणि पुढे इतके रंजक होत गेले की वाळू चोरीची प्रकरणे हाताळण्यात सराईत झालेल्या पोलिस आणि महसूल अधिकारी, कर्मचारी यांनी सरळ-सरळ दोन्ही खात्याची इज्जत वेशीवर टांगली आहे.

पोलिस स्टेशनच्या आवारात सुरवातीला वाळूच्या वर क्रशसँड टाकण्याचा प्रताप, तर महसुलकडून पाच ब्रास पंचनामा कमी, पुढे वाळूवर क्रशसँड टाकत थेट न्यायालयात हेराफेरी करण्याचे कारस्थान केले. एवढे करुनही न थांबलेल्या दोन्ही खात्यांकडून अजून या प्रकरणाची चौकशी चालू असल्याचे वक्तव्य दोन्ही जिल्हा प्रशासनाला शोभणारे नाही. याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी पहिला पंचनाम्याचा पर्दाफाश करुन दुसरा पंचनामा होऊन पाच ब्रासची कागदोपत्री वाळूचोरी उघड झाली. यामध्ये आता केवळ पंचनामा करणारे कर्मचारी बळी जाणार हे तूर्तास तरी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांकडून खासगीत सांगितले जात आहे. मात्र काही दिवसानंतर या प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु केलेल्या पुणे ग्रामीण पोलिसांकडूनही या प्रकरणात दोष कोणा एका दोन कर्मचाऱ्यांवर शेकविला जाणार हे ही नक्की.

या प्रकरणात अधिकारी सांगतील असेच पोलिस कर्मचारी वागल्याने हे घडल्याची शिक्रापूर पोलिस ठाण्यातील काही अधिकारी, कर्मचारी तर निवृत्त झालेले काही कर्मचारी खासगीत सांगत आहे. त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक आता नेमकी कोणावर कारवाई करणार याची उत्सुकता सर्वांना आहे. सध्याच्या पोलिस चौकशीत पोलिस चौकीतील सीसीटीव्ही फुटेज पाहिले जाईल. त्यातील व्यक्तीचा शोध ही घेतला जाइल. मात्र या कृतीचा " मास्टर माईंड "नेमका कोण ...? तो या चौकशीत उपविभागीय पोलिस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांना सापडला आणि त्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कारवाई केली तरच पोलिसांशी संबंधित तपासाला पोलिसांनी योग्य न्याय दिला असे म्हणता येईल.

माञ, सध्यातरी हे प्रकरण इथेच थांबेल असे तूर्तास तरी वाटत नाही. सध्या दोन्ही खात्याकडून चौकशी होणार आणि या  प्रकरणात तथ्य असल्याने  कुणाचा ना कुणाचा बळी जाणार हे मात्र नक्की...मात्र यामध्ये अधिकारी सापडणार की कर्मचारी सापडणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. हे प्रकरण उघडकीस येऊन काही दिवस उलटल्यानंतर पुणे ग्रामीण  पोलिस चौकशीसाठी जागे झाल्याने आता पुणे ग्रामीण पोलीसांचे नागरिकांकडून उपहासात्मक कौतुक होत आहे .

Title: How did crush sand come in place of sand
प्रतिक्रिया (1)
 
Dinesh
Posted on 5 August, 2020

हे काय नवीन नाही..... काहीही होणार नाही पुढे असे खूप वेळा घडले असेल..