शेतकऱ्याचा मुलगा पंचविशीतच न्यायाधीश!
कारेगाव (ता. शिरूर) येथील अक्षय पांडुरंग ताठे हा युवक अवघ्या पंचविशीत आणि पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाला आहे. अक्षयवर परिसरामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.शिरूर: कारेगाव (ता. शिरूर) येथील अक्षय पांडुरंग ताठे हा युवक अवघ्या पंचविशीत आणि पहिल्याच प्रयत्नात न्यायाधीश झाला आहे. अक्षयवर परिसरामधून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
विशेष म्हणजे अक्षयचे आई आणि वडील दोघेही अल्पशिक्षित आहेत. अक्षयने जिद्दीच्या जोरावर यश मिळवले आहे. अक्षयचे वडील पांडुरंग व आई मनीषा हे शेतीत अहोरात्र काम करतात. मात्र, आपल्या मुलांना आपल्यासारखे कष्ट उपसावे लागू नये, म्हणून अक्षय व आकाश या दोन्ही मुलांना शिकवून पुढे न्यायचे, अशी खूणगाठ मनाशी बांधली होती. शेतीत अहोरात्र कष्ट करत शिक्षणासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या; पण बीसीएस कॉम्प्युटरच्या दुसऱ्या वर्षाला असलेल्या आकाश (वय 21) याचा तीन वर्षांपूर्वी अपघातात मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंब कोसळून पडले; पण अक्षय याने जिद्द सोडली नाही. लहान भावाच्या निधनानंतर कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी जिद्दीने आपल्या खांद्यावर घेऊन शिक्षणाची कास धरली.
पुणे महापालिकेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण झालेला अक्षय पाचवी ते दहावी शिरूरच्या विद्याधाम प्रशालेत शिकला. सी. टी. बोरा कॉलेजमधून पदवीधर झाला. पुढे सन 2018 ला पुणे विद्यापीठातून एलएलबी व एलएलएम केल्यानंतर थेट "दिवाणी न्यायाधीश व न्यायदंडाधिकारी' ही परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात तो यशस्वी झाला. मी आणि भाऊ आकाश यांच्याकडून आईवडिलांनी पाहिलेले स्वप्न पूर्ण करण्याचा माझा निर्धार असून, या दुहेरी जबाबदारीच्या स्वप्नपूर्तीसाठी यापुढेही अधिक परिश्रम व सातत्यपूर्ण अभ्यास करीतच राहणार असल्याचे अक्षय याने सांगितले.