निवेदक सुनील थिगळे : घराघरात पोहचलेला शब्दांचा जादूगार हरपला...

गेली दोन दिवस मी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयत्न करतोय. पण शब्द रचनाच करता येत नव्हती. सतत कंठ दाटून येत होता. त्यांचा फोटो पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या.

आपल्या लयबद्ध आवाजाच्या जबरदस्त सामर्थ्यावर विविध समारंभाच्या माध्यमातून पुणे शहर, जिल्हा, मुंबई व उपनगराच्या घराघरात पोहोचलेले ज्येष्ठ निवेदक सुनील थिगळे गेल्याची बातमी खेड येथील शालीमार ढाब्याचे मालक बाळासाहेब सांडभोर व सेवानिवृत्त कृषी अधिकारी अशोकराव शिंदे यांच्याकडून समजली. मनाला प्रचंड वेदना व धक्का बसला. त्यांच्या निवेदक कारर्कीर्तीच्या शुभारंभ प्रसंगातील मी एक साक्षीदार आहे. त्यांचे निधन झाले, यावर माझा विश्वासच बसला नाही.

गेली दोन दिवस मी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयत्न करतोय. पण शब्द रचनाच करता येत नव्हती. सतत कंठ दाटून येत होता. त्यांचा फोटो पाहिल्यानंतर माझ्या डोळ्यांच्या कडा ओल्या झाल्या. त्यांचा संपूर्ण प्रवास अतिशय संघर्षमय व कष्टाचा होता. सन 2000 मध्ये आंबेगावचे सुपुत्र व राज्याचे विद्यमान गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्रीपदी निवड झाली. मंचर येथे त्यांचा सन्मान सोहळा करण्याचे ठरलं. त्यासाठी सूत्रसंचालन करणारा एखादा  नामवंत निवेदक मिळतो का? याच्या शोधात आम्ही होतो. माझे बंधू पत्रकार संतोष वळसे पाटील नियोजनाच्या मिटींगला उपस्थित होते. त्यांनी आवर्जून सुनील थिगळे यांचे नाव सुचविले. शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जेष्ठ नेते शिवाजीराव ढोबळे, बाळासाहेब बाणखेले यांनी थिगळे यांच्या नावाला मान्यता दिली. मंचरच्या प्राथमिक शाळेसमोर वळसे पाटील यांचा सत्काराचा झालेला कार्यक्रम लक्षवेधक ठरला. वळसे पाटील यांच्यासह सर्व मान्यवरांनी सुनीलराव यांचे कौतुक केले. त्यानंतर आंबेगाव तालुक्यात कार्यक्रम म्हटला की, आवर्जून थिगळे यांना बोलावले जात होते. थिगळे यांची खेड तालुका ही जन्मभूमी आहे. पण त्यांची कर्मभूमी आंबेगाव तालुका आहे. असे म्हंटल्यास ते वावगे ठरणार नाही.

शब्दांचे ते जादूगार होते. आवाजातील चढ-उतार समयसूचकता ही वाखणण्यासारखी होती. आंबेगाव तालुका पत्रकार संघाच्या अधिवेशन कार्यक्रमाला ते निवेदक म्हणून आवर्जून उपस्थित राहत होते. खेड तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांचीही त्यांना मोलाची साथ लाभली. ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, आर. आर पाटील, शरद पवार, अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या सभांचे सूत्रसंचालन थिगळे यांनी केले आहे.

लग्न समारंभ किंवा अन्य कार्यक्रम असेल, त्यांची हजेरी म्हणजे त्या कार्यक्रमाची उंची वाढतच होती. हजरो लोकांची नावं त्यांची तोंडपाठ होती. कार्यकर्ता किंवा सर्वसामान्य असो कार्यालयात पाऊल टाकल्यानंतर त्याचं नाव लगेच उमटत होतं. बिरबलाप्रमाणे हजारजबाबी वकृत्व त्यांच्याकडे होते. मनामध्ये कधीही गर्वाची भावना नव्हती. त्यांची नम्रता वाखाणण्यासारखी होती. केवळ निवेदन करत नव्हते तर त्या दिवसाचे महत्त्व समाजाला समजावून सांगत होते. अंधश्रद्धा निर्मुलनावरही ते भाष्य करत होते. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून कन्या पूजा निवेदनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहे.

पूजाची साम टीव्हीवर निवड झाली. तेव्हा सुनीलराव यांनी मला आवर्जुन आनंदाची बातमी सांगितली होती. बोलण्यातून त्यांचा आनंद ओसंडून वाहत होता. सुनीलराव यांनी ग्रामीण भागांमध्ये नवोदित तरुणांची फळी सूत्रसंचालनामध्ये सहभाग व्हावी म्हणून पुढाकार घेतला. त्यांच्यासाठी राजगुरुनगर येथे प्रशिक्षणाचे कार्यक्रम आयोजित केले होते. एक दोन वेळा मार्गदर्शक म्हणून मलाही त्यांनी आवर्जून बोलावले होते. त्यानंतर हॉटेल व्यवसाय सुरू केला होता. त्या हॉटेल मध्ये मी यावं असा निरोप ते मला अशोकराव शिंदे यांच्या माध्यमातून सतत देत होते.

मंचरला बाळासाहेब सांडभोर, तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे यांच्यासमवेत दोन-तीन वेळा जेवणाचा आनंद अजय घुले यांच्या निवासस्थानी घेतला. पण गप्पांचा आनंद हा वेगळाच होता. अतिशय नम्रतापूर्वक बोलणं हा त्यांचा आवडीचा विषय होता. त्यांनी माणसांची संपत्ती फार मोठ्या प्रमाणात जोडली आहे. याचा मला आजही सार्थ अभिमान आहे. निवेदक म्हणून काम करताना प्रसंगावर आवाजातील चढवा तर अपेक्षित असतो. याचे सतत ते भान ठेवत होते.

लग्नसमारंभ किंवा अन्य आनंदाच्या कार्यक्रमातील आवाज व दशक्रिया प्रसंगातील आवाजातील चढउतार व चेहऱ्यावरील हवभाव यामधील तफावत माझ्यासारख्याच्या नजरेतून कधीही सुटली नाही. ग्रंथ, कादंबर्या, वृत्तपत्र वाचन हा त्यांचा छंद होता. त्यामुळेच ते राजकीय, सांस्कृतिक व पुरातन काळातील परिपूर्ण माहिती देत होते. सतत हसतमुख चेहरा होता. आपल्या बोलण्यामुळे समोरच्या व्यक्तीच्या भावनांना कधीही ठेच लागणार नाही याची ते सतत काळजी घेत होते. प्रत्येक कार्यक्रमाची उंची वाढेल यासाठी त्यांचा जाणीवपूर्वक प्रयत्न होता. घराघरांमध्ये पोचलेल्या या महान शब्दांच्या जादूगाराला भावपूर्ण श्रद्धांजली.

- डी. के वळसे पाटील, जेष्ठ पत्रकार, मंचर.

Title: manchar famous announcer sunil thigale passes away dk walse