अशोक सराफ यांना ‘मामा’ हे नाव कसं पडलं? घ्या जाणून...

चित्रपटसृष्टीमध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’ या टोपण नावाने हाक मारतात. मात्र, त्यांना ‘मामा’ का म्हणतात? हे फार कमी जणांना माहित आहे.

मुंबई: मराठी आणि हिंदी कलाविश्वात, सोबतच रंगभूमीवरही अधिराज्य गाजवणारं आणि प्रेक्षकांच्या मनात, त्यांच्या घरातही कायमचे स्थान मिळवलेले एक नाव म्हणजे अशोक सराफ. अशोक सराफ हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्धी अभिनेते आहेत, त्यांनी आपल्या अनोख्या विनोदी शैलीच्या जोरावर तब्बल तीन दशकं मराठी प्रेक्षकांना खळखळवून हसवले. त्यांचे ‘बनवाबनवी’, ‘गंमत जंमत’, ‘धुमधडाका’, ‘एक डाव भुताचा’, ‘नवरी मिळे नवऱ्याला’ असे कित्येक चित्रपट आजही आवडीने पाहिले जातात.

चित्रपटसृष्टीमध्ये वावर असणाऱ्या अशोक सराफ यांना चित्रपटसृष्टीमध्ये सारेच जण ‘मामा’ या टोपण नावाने हाक मारतात. मात्र, त्यांना ‘मामा’ का म्हणतात? हे फार कमी जणांना माहित आहे. आज आशोक सराफ यांचा वाढदिवस आहे त्या निमित्तानं जाणून घेऊयात त्यांच्या या खास नावाविषयी...

अशोक सराफ यांचा जन्म 1947 साली मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. ते मुळचे बेळगावचे असून, दक्षिण मुंबईच्या चिखलवाडी भागात त्यांचे बालपण गेले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. वयाच्या 18 व्या वर्षी वि. वा. शिरवाडकरांच्या ‘ययाती’ आणि ‘देवयानी’ या नाटकांमधून त्यांनी अभिनयसृष्टीत पदार्पण केले. त्यांनी काही संगीत नाटकांतूनदेखील भूमिका केल्या आहेत.

अशोक मामा म्हणत जा...
नाटक, चित्रपट, मालिका असा प्रवास करत असतांनाच त्यांना ‘मामा’ हे नाव पडले. त्याचे हे नाव पडण्यामागेदेखील रंजक किस्सा आहे. काही वर्षांपूर्वी एका चित्रपटाच्या सेटवर प्रकाश शिंदे नावाचा कॅमेरामन होता. तो अनेक वेळा सेटवर त्याच्या मुलीला घेऊन येत असते. त्यावेळी ती लहान मुलगी सतत अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून हे कोण? असा प्रश्न आपल्या वडिलांना विचारत असे. त्यावेळी प्रकाशने तिला हे अशोक मामा असून तू त्यांना ‘अशोक मामा’ म्हणत जा असे सांगितले. त्यानंतर त्या मुलीच्या निमित्ताने सेटवरील सर्वच जण त्यांना मामा अशी हाक मारु लागले. पुढे हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की मनोरंजनसृष्टीतील प्रत्येक जण त्यांना मामा अशीच हाक मारु लागले.

बँकेतील नोकरी...
एका चित्रपटासाठी कोट्यवधींचं मानधन घेणारे अशोक सराफ कधीकाळी बँकेत नोकरी करत होते. पण अभिनय करता यावा यासाठी त्यांनी वडिलांच्या विरोधात जाऊन नोकरी सोडली होती. यांना अभिनय चांगला जमत असला तरी पोटापाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी एखादी नोकरी करावी, अशी त्यांच्या कुटुंबीयांची इच्छा होती. शिवाय, व्यवसायिक होऊन भरपूर पैसे कमवावे अशीही इच्छा वारंवार त्यांचे वडील व्यक्त करायचे. त्यामुळे वडिलांच्या इच्छेखातर आणि आर्थिक तजवीजीसाठी त्यांनी बँकेत नोकरी करायला सुरुवात केली. पण त्यांचे तिथं मन रमेना ते वारंवार सुट्या काढून कधी हाफ डे घेऊन, तर कधी नातेवाईकाचा मृत्यू झालाय असे कारण सांगून थेट नाटकाचे प्रयोग करण्यासाठी जायचे.

अखेर त्यांची अभिनेता होण्याची इच्छा आणि त्यासाठी सुरु असलेली धडपड पाहून त्यांच्या वडिलांचं मन बदलले. त्यांनी अशोक सराफ यांना अभिनयात करिअर करण्याची मुभा दिली. अर्थात अभिनयसृष्टीत ते प्रामाणिकपणे काम करतील असेही वचन त्यांनी घेतलं. अन् या वचनाचं आजतागायत पालन ते करत आहेत. चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत अशोक सराफ म्हणाले होते, "वडिलांच्या इच्छेप्रमाणे मी बिझनसमॅन नाही झालो पण बिझनसमॅनप्रमाणे पैसे आणि त्याहून जास्त प्रसिद्धी मी मिळवली."

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: marathi actor how did ashok saraf get the name mama
तुमची प्रतिक्रिया द्या
संपूर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे