शाश्वतपणाच्या माध्यमातून पुनरुज्जीवनाची व नफा कमावण्याची संधी

श्री. रामनाथ वैद्यनाथन हे गोदरेज समुहात ‘पर्यावरणीय शाश्वतता’ या विभागाचे प्रमुख व सरव्यवस्थापक आहेत.

‘कोविड-19’च्या संकटामुळे माणसांचे केवळ जीव आणि जीवनमान इतकेच धोक्यात आले नाही, तर जगाची सामाजिक आणि आर्थिक रचनाही विस्कळीत झाली आहे. निसर्गाचा कोप झाला, तर आपण कसे बळी पडू शकतो, याची जाणीव यातून सर्वांना झाली. केवळ एक मोठे संकट आले, तर आपली अर्थव्यवस्था कोलमडून पडू शकते, हेही यातून आपल्याला समजले. शाश्वत मूल्यांचे धडे आपल्याला या कोविडच्या साथीने दिले आहेत. ज्या कंपन्यांच्या, संस्थांच्या व्यावसायिक धोरणात गेल्या अनेक वर्षांत शाश्वत मूल्ये जोपासली गेली आहेत, अशा जबाबदार कंपन्या, संस्था विपरीत परिस्थितीत सहज तरून जातात आणि अतिशय धीराने संकटाचा सामना करतात, हेही यातून ठळकपणे दिसून आले.

शाश्वतपणाची संकल्पना ही उद्योगविश्वाला तशी नवीन नाही; मात्र तरी हरीत जग निर्माण करण्यात, ते मजबूत करण्यात आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यात आपण हातभार लावतो का, हा प्रश्न आहे.

वाढता विसंवाद
सध्याच्या काळात शाश्वतपणा हे प्रत्येक मोठ्या उद्योगाचे वैशिष्ट्य बनले आहे. तसेच ते या उद्योगांच्या भागधारकांना स्वारस्य असलेले एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. शाश्वतपणाच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित केलेल्या अनेक कंपन्यांनी त्यासंबंधी कार्य करून हरित प्रमाणपत्रेही मिळवली आहेत. त्यांनी घेतलेला पुढाकार हा विश्वासार्ह, प्रमाणित आहे आणि त्यांच्या वार्षिक शाश्वत अहवालात त्यांची नोंदही झालेली आहे. या कंपन्यांच्या सक्रिय योगदानाशिवाय आपण पृथ्वीवरील जबाबदार नागरिक या नात्याने ‘ग्लोबल वॉर्मिग’ 1.5 अंश सेल्सियसपेक्षा कमी करण्याचे लक्ष्य गाठू शकणार नाही, अशी स्थिती आहे. याचा अर्थ कोठेतरी पूर्णपणे विसंवाद आहे, असा होतो. ढोबळ विश्लेषण केले असता, दोन मुद्दे समोर येतात. पहिला असा, की  परिस्थिती अगदी भयानक असल्याशिवाय प्रयत्नच करायचे नाहीत, असा आपला मानवी स्वभाव यामध्ये आड येतो. सध्या सुरू असलेली कोविडची साथ आणि काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील वीजपुरवठा खंडीत होण्याचा प्रकार ही याची ठोस उदाहरणे आहेत. यातून शाश्वत मानसिकता व आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याची क्षमता या सुधारण्याची गरज आहे, याचे भान उद्योग क्षेत्राला आले आहे. सध्याच्या काळात तरी आपले सर्व लक्ष कोविडची साथ आटोक्यात आणण्यावर केंद्रित झालेले आहे; तथापि लवकरच आपल्याला पर्यावरणीय प्रश्नांकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे; अन्यथा आता आहे त्याच्या दहापट अधिक तीव्र अशी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते.

दुसरे म्हणजे, आताच्या यंत्रणांमध्ये आणि धोरणांमध्ये बदलांची आवश्यकता आहे. हे बदल सार्वत्रिक स्तरावर व्हायला हवेत. उदाहरणार्थ, अपारंपरीक ऊर्जेसंबंधी काही निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा राष्ट्रीय व राज्यस्तरीय धोरणांमध्ये फरक दिसून येतो. आपल्याकडील धोरणेही दर काही वर्षांनी बदलत राहतात. या अनिश्चिततेमुळे खासगी गुंतवणूकदार कचरतात. धोरणे ही नेहमी एकसमान, सुसंगत. स्पष्ट आणि खासगी उपक्रमांना पूरक असली पाहिजेत.

इतर आव्हाने
सध्या सुरू असलेल्या संकटाने आपल्या पुरातन कामगार कायद्यांबाबत पुन्हा चर्चा करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. उद्योग-व्यवसायांना आवश्यक ती चालना मिळण्यासाठी हंगामी व रोजंदारीवरील मजुरांविषयीच्या मागण्यांना पाठिंबा देणारी धोरणे तयार केली जाणे आवश्यक आहे. पाणी हा एक अतिशय महत्त्वाचा स्रोत आहे. त्याचे हे महत्त्व अबाधित ठेवणे व त्यासाठीची किंमत चुकविण्यास भाग पडणे हे भवितव्यासाठी गरजेचे आहे. कृषी आणि औद्योगिक वापरासाठी पाण्याचे मूल्यनिर्धारण करण्याची गरज आहे. ‘हरित’ या शब्दाची व्याख्या स्पष्ट, प्रमाणित करावी लागेल. औद्योगिक उत्पादने व प्रक्रिया या हरित स्वरुपाच्या व्हाव्यात या दृष्टीने, मापदंड, मापन व प्रमाणिकरण हे हरित करण्यासाठी उद्योगांना त्यातून चालना मिळू शकेल. मोठी किंमत द्यावी लागणाऱ्या हरित स्वरुपाच्या सोल्युशन्ससाठी जागरुकता वाढावी व ग्राहकांची स्वीकृती मिळावी या दृष्टीने औद्योगिक संघटनांनी आणि केंद्रीय पातळीवरील संस्थांनी प्रसार मोहिमा आखायला हव्यात. उर्जा वितरणाच्या क्षेत्रात वितरणातून व पारेषणातून विजेचा अपव्यय होतो व त्याचा देशाला फटका बसतो. सध्याच्या पायाभूत सुविधा विद्युत मोटारींसाठी फारशा अनुकूल व पुरेशा नाहीत. त्यामुळे ग्राहकही वाहतुकीसाठी या हरित स्वरुपाच्या साधनांचा वापर करण्यास धजावत नाहीत.

तोडगा
शीर्ष-स्तरीय धोरणे आखून पद्धतशीर बदल करण्याबरोबरच, निर्धारित केलेली लक्ष्ये गाठणे व त्यांचा पाठपुरावा करणे यांवर भर देण्याची वेळ आता आली आहे. ऊर्जा क्षेत्राचा विचार करायचा झाल्यास,  अपारंपरिक ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता यांचा अंगीकार करण्यासाठी सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) मॉडेल वापरले जाऊ शकते. अर्थात त्यासाठी संपूर्ण राज्यात समानता, सुसंगतता आणि एकल धोरण असायला हवे. हरित पद्धतींचा अंगीकार न करणाऱ्यांना शिक्षा करता आली नाही, तरी हरित पद्धतींचा अवलंब करणाऱ्यांना उत्तेजन देणे आवश्यक आहे. धोरण आखणी, दरांची आकारणी, दस्तऐवजीकरण आणि प्रक्रिया यांमध्ये सातत्य आणि चिकाटी असणे आवश्यक आहे. पारदर्शकता, खुलेपणा आणि शाश्वतपणाची जागतिक मानके यांच्याच आधारे व्यवसायांचे वर्गीकरण करायला हवे. मोठे, ठळक बदल घडवून आणण्याच्या हेतूंनी या सगळ्याचा पाठपुरावा करणे आवश्यक आहे. त्याकरीता लहान, छोट्या उद्दिष्टांऐवजी महत्त्वाकांक्षी व व्यापक लक्ष्ये ठरविण्याची वेळ आली, तरी तसे करायला हवे.

‘कोविड-19’च्या साथीमुळे आपल्या कामकाजाच्या पद्धती उलट-सुलट झाल्या आहेत, तसेच त्या अनपेक्षित मार्गांनी नेण्यास आपल्याला भाग पडले आहे. आपल्या भवितव्यावर एक लांबलचक, धूसर सावली पडली आहे. दूरस्थ पद्धतीने काम करणे, कामगारांची टंचाई अशासारख्या आतापर्यंत कधीही विचारात न घेतलेल्या परिस्थितीला उद्योग-व्यवसायांना तोंड द्यावे लागत आहे. आणि तरीही उद्योगांना ही परिस्थिती स्वीकारणे, या पद्धती अंगीकारणे भाग पडत आहे. त्याशिवाय पर्याय उरलेला नाही. कच्च्या मालाचा पुरवठा सुरळीत व परवडणाऱ्या दरांत होण्याकरीता, काही कंपन्यांनी एकत्र येऊन मालाची वाहतूक एकात्मिक पद्धतीने करण्याची पद्धत सुरू केली आहे. एरवी त्यांनी असे काही केलेही नसते. कार्यक्षमतेत सुधारणा व शाश्वतपणा आहे, तोवर कामकाज करण्याच्या विविध पद्धतींचा विचार करून त्या दिशेने धैर्याने पाऊल टाकण्यातच शहाणपणा आहे, हे उद्योग क्षेत्राने आता ओळखले आहे. उदाहरणार्थ, सर्वत्र ऑटोमेशन वाढलेले असताना, भविष्यातील नोकरी मिळण्यासाठी वाढीव कौशल्ये असणे आवश्यक आहे हे ओळखून विस्थापित कर्मचार्‍यांना ते देण्यात येत आहे. दूरस्थ पद्धतीने काम करणे हे आता रूढ झाले असल्याने 70 ते 80 टक्के अनावश्यक प्रवास टाळता येऊ लागला आहे. साहजिकच कार्बन उत्सर्जनामध्ये घट होऊ लागली आहे. महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय परिषदा ऑनलाईन भरवणे शक्य झाले आहे, त्यातून इंधन बचत व पर्यावरण रक्षण होऊ लागले आहे. कामकाज आणि व्यवसाय करण्याचे हे अधिक कार्यक्षम मार्ग असल्याचे सहज दिसून येते. खरे तर, शाश्वत पद्धती अवलंबिल्यामुळे दीर्घ काळात आपोआपच नफा मिळू लागतो, हेच खरे.

वाढ आणि शाश्वतता एकमेकासंगे
सामाजिक आणि पर्यावरणीय स्थिरतेमुळे दीर्घकालीन नफा होत असतो. उदाहरणार्थ, जर एखादा व्यवसाय शून्य-उत्सर्जन करणाऱ्या उत्पादन प्रक्रियेत गुंतलेला असेल, तर त्या प्रक्रियेतील गुंतवणूकीमुळे आपोआप पाणीबचत होईल आणि कालांतराने त्या व्यवसायाच्या नफ्यात सुधारणा होईल. तसेच, कार्बन उत्सर्जन कमी होईल, अशा ठिकाणी गुंतवणूक करणारी एखादी संस्था नंतरच्या काळात कार्बन कमी करण्याच्या प्रक्रियेमध्ये बचत करेल. एखादी गोष्ट आत्मसात करण्याची किंमत ही घालवण्याच्या खर्चापेक्षा कमी असते. म्हणूनच, हरित पद्धती अवलंबणे व व्यववायात प्रगती साधणे यांच्यात आता द्वैत राहिलेले नाही. शाश्वतपणा हे आता अधिक सोपे, सोयीचे आणि आवश्यक असे धोरण बनलेले आहे.

‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स हे जगातील काही गुंतागुंतीचे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्या संपत्तीचे मोठ्या प्रमाणात दान करीत असतात. सामाजिक हितासाठी उद्योगपतीने घेतलेल्या निर्णयाचे हे चांगले उदाहरण आहे. ‘गोदरेज इंडस्ट्रीज’मध्येदेखील शाश्वत स्वरुपाच्या कामांना स्पर्धा म्हणून गणले जात नाही. शाश्वतपणाच्या बाबतीत उद्योग-व्यवसायांनी एकमेकांशी सहकार्य करायलाच हवे. आपल्या ग्रीनर इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून, शून्य कचरा, कचऱ्यावर प्रक्रिया, शून्य कार्बन, पाणीवापरातील संतुलन, विशिष्ट उर्जा वापरामध्ये 30 टक्क्यांची कपात आणि अपारंपरिक उर्जेच्या स्रोतांचा जास्त उपयोग अशी हरित स्वरुपाची यंत्रणा ‘गोदरेज’मध्ये राबविली जाते.

निष्कर्ष
कामकाजात, धोरणांत, दृष्टीकोनांमध्ये बदल घडविण्याच्या दृष्टीने सर्व व्यावसायिक प्रयत्न करीत असताना, त्यांनी शाश्वततेला केवळ प्रतिसाद देणे पुरेसे नाही, तर त्याबाबतीत वास्तववादी, आधारभूत आणि प्रामाणिक असणेही आवश्यक आहे. शाश्वत पद्धतींमधील 80 ते 90 टक्के भागाचे आचरण अत्यंत कमी खर्चात साध्य करता येते, ही यातील चांगली बातमी आहे. हवामानातील बदल कमी करण्यासंबंधी बांधिलकी मानण्यासाठी प्रामाणिक राहण्याची आणि चर्चेची वेळ आता आली आहे. व्यवसाय जितके शाश्वततेकडे वाटचाल करतील, तितके ते छायेमध्ये दडून राहणाऱ्या संकटांना तोंड देण्यास अधिक सज्ज राहणार आहेत.

(श्री. रामनाथ वैद्यनाथन हे गोदरेज समुहात ‘पर्यावरणीय शाश्वतता’ या विभागाचे प्रमुख व सरव्यवस्थापक आहेत. त्यांना पर्यावरण, उर्जा आणि जल या क्षेत्रांतील एक दशकाहून अधिक कालावधीचा अनुभव आहे. त्यांनी प्रक्रिया अभियांत्रिकी, कार्य, रणनीती सल्लामसलत, व्यवसाय विकास आणि व्यवस्थापन यांमध्ये नियामक / धोरणकर्ते या भूमिका बजावलेल्या आहेत.)

Title: ramnath vaidyanathan write covid 19 and nature article for s