आज तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त विशेष बातमी

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): कर्णबधिर मुलांचे विशेष शिक्षक असलेल्या सुभाष कट्यारमल यांनी मतिमंद मुलांच्या पालकांच्या गरजेने २००५ साली वाडा पुनर्वसन येथे जय महाराष्ट्र ग्रामविकास शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सेवाधामची स्थापना केली. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बौद्धिक दिव्यांग मुलांच्या करिता विशेष शिक्षण, निवास व भोजनासह सर्व सोयी सुविधा मोफत करण्यात येत असल्याने त्यांच्यामाध्यमातून पवन कट्यारमल यांच्याकडून ग्रामीण भागातील बौद्धिक व दिव्यांग मुलांच्या शिक्षणासह त्यांचा विकास होत आहे.

पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील सेवाधाम विद्यालयाची जबाबदारी मुख्याध्यापक पवन कट्यारमल सांभाळत आहे, सामाजिक कार्याची आवड असलेल्या पवन कट्यारमल यांनी बौद्धिक दिव्यांग मुलांच्या विकासासाठी स्वतःला वाहून घेतले असून दिव्यांग मुलांच्या पालकांना समुपदेशन, सल्ला व मार्गदर्शन केंद्र, दिव्यांगत्व जनजागृती, दिव्यांग प्रतिबंधात्मक उपाययोजना यांसह विविध उपक्रम यशस्वीपणे राबवत आहेत.

विशेष मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन ग्रामीण भागातील दिव्यांग मुले सुद्धा यश संपादन करतात हे दाखवून दिले आहे, प्रतिकुल परिस्थितीत सेवाधामचे हे कार्य सुरु असताना पुणे येथील चंद्रप्रकाश फौंडेशन प्रकाश धोका यांनी सेवाधाम ची जागेची गरज ओळखून त्यांना जागा घेत इमारत बांधण्यास सहाय्य केले.

सदर ठिकाणी इमारत बांधताना दिव्यांग मुलांसाठी आवश्यक बाबींचा विचार करुन इमारत उभारण्यात आली. विशेष मुलांना शिकवताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेत अर्धवर्तुळाकार बैठक व्यवस्था व डिजीटल क्लासरुम अशा सुविधा लोकसहभागातून उपलब्ध करुन देण्यात आल्या.

दिव्यांग मुलांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात तसेच सेवाधामला आय एस ओ मानांकन मिळाले आहे. इतकेच नव्हे तर दिव्यांग मुलांसाठी पवन कट्यारमल हे चोवीस तास मुलांच्या देखभालीसाठी उपलब्ध असतात. शिस्तप्रिय व हाती घेतलेले कार्य आत्मीयतेने पूर्ण करणारे पवन कट्यारमल अनेक पुरस्कार मिळाले आहेत. मात्र दिव्यांग मुलांच्या पालकांच्या डोळ्यातील एक समाधानाचा अश्रू हाच माझ्या साठी सर्वोच्च पुरस्कार असल्याचे पवन कट्यारमल मानत असून प्रकाश धोका व सुभाष कट्यारमल यांच्या मार्गदर्शनामुळे हे कार्य करताना सदैव प्रेरणा मिळते असल्याचे त्यांनी सांगितले.

 

विशेष मुलांसाठी असलेल्या सेवाधाम विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीत पवन कट्यारमल यांचे सहकारी म्हणून संजय पोटफोडे, शुभांगी पायमोडे, सुनिता गव्हाणे, वंदना नसुर्डे, महादेव नाचण या सहकाऱ्यांनी प्रामाणिकपणे साथ मिळाली असल्याचे पवन कट्यारमल यांनी सांगितले.