Baramati teacher

शिक्षक दारू पिऊन वर्गातच झोपला; गावकऱ्यांनी काढला व्हिडीओ अन् पुढे…

महाराष्ट्र

बारामती: तरडोली (ता. बारामती) येथील भोईटे वस्तीवरील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक शिक्षक चक्क दारू पिऊन झोपला होता. सजग नागरिकाने अचानक शाळा भेट केल्याने सदर प्रकार समोर आला. याबाबतचा व्हिडीओ बनविला गेल्याने बारामती तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी चौकशी समिती नेमली असून कडक कारवाईचे संकेत दिले आहेत.

भरत चव्हाण असे या शिक्षकाचे नाव आहे. भोईटेवाडी जिल्हा परिषद शाळेत 25 विद्यार्थी शिकत आहेत. गेल्या वर्षभर ग्रामस्थांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली होती. शिक्षक खुर्चीत बसून टेबलावर डोके ठेवून झोपी गेला होता. दारू प्यायल्याने शुद्धीत नव्हती. सबंधित व्यक्तीने संबंधित घटनेचा व्हिडिओ केला. याची तक्रार वरिष्ठांकडे केली आहे. त्यावरून संबंधित शिक्षकाची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे. शिक्षकाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. शिक्षकाची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. तपासणीत जे समोर येईल त्यावर कडक कारवाई होईल, असे शिक्षणाधिकारी गावडे यांनी सांगितले आहे. मुख्याध्यापकाला देखील नोटीस बजावली असल्याचे गावडे यांनी सांगितले.

शाळेतील शिक्षकाचा हा प्रताप पाहून पालकांनी देखील संताप व्यक्त केला आहे. ग्रामीण भागात शिक्षणाच्या सोयी उपलब्ध नसतात. त्यात अनेक नागरिक आर्थिकदृष्ट्या प्रबळ नसतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांना शिकवणे पालकांसमोर मोठे आव्हान असते. शिक्षणासाठी गावातील प्राथमिक शाळा हाच एकमेव पर्याय पालकांसमोर असतो. मात्र, याच शाळेतील शिक्षकांचे असे प्रताप समोर येत असल्याने पालकदेखील चांगलेच संतापले होते.

दरम्यान, समाजात शिक्षकाला वेगळं स्थान प्राप्त आहे. शिक्षण हे अनेकांच्या आयुष्यात गुरुस्थानी असतात. शिक्षकांच्या पावलावर पाऊल ठेवून विद्यार्थी आणि पालक भविष्याची स्वप्न रंगवत असतात. मात्र, सध्या शिक्षकीपेशाला कलंक लागेल अशा घटना समोर येत आहे. लैंगिक छळ, बलात्कार आणि आता तर चक्क दारु पिऊन वर्गात झोपले असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.