कोरेगाव भीमाच्या कार्यक्रमात बसचे नियोजन कोलमडले

शिरूर तालुका

नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यास प्रशासनाची तारांबळ

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील शौर्यदिनी विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी येणाऱ्या नागरिकांना पुराविण्यात आलेल्या बस अपुऱ्या पडल्याने बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले असून नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी पोलिसांसह प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे 1 जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या नंतर प्रशासनाने कमालीची खबरदारी घेतलेली असताना येणाऱ्या समाज बांधवांसाठी शिक्रापूर व लोणीकंद येथे स्वतंत्र पार्किंग व्यवस्था करुन तेथून शासनाच्या वतीने ठेवण्यात आलेल्या बसच्या माध्यमातून समाज बांधवांना जयस्तंभ जवळ आणून सोडले जात आहे. मागील वर्षी कोरोनाचे निर्बंध असताना देखील मोठ्या प्रमाणात नागरिक येथे अभिवादन करण्यासाठी आले होते.

परंतु यावर्षी मोठ्या प्रमाणात समाज बांधव येणार असल्याचे बोलले जात असताना प्रशासनाने दोन्ही बाजूने 140 अशा सुमारे 280 बसची व्यवस्था केलेली होती. मात्र दुपार नंतर अचानकपणे नागरिकांची गर्दी वाढू लागल्याने बसेस देखील कमी पडू लागल्या. त्यामुळे नागरिकांना बस उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली तर नागरिकांनी देखील लवकर बस उपलब्ध होण्यासाठी मोठी गर्दी केल्याचे दिसले, तर घडलेल्या प्रकारामुळे बसचे नियोजन कोलमडल्याचे दिसून आले.