समृद्धी महामार्गावर कार जळून खाक…

महाराष्ट्र

वैजापूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते समृद्धी महामार्गाच्या नागपूर -शिर्डी या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण सोहळा पार पडलं. परंतु उद्घाटनानंतर या महामार्गावर अपघातांची मालिका सुरु झाल्याने हा मार्ग पुन्हा चर्चेत आला आहे. अशातच औरंगाबादच्या वैजापूर जवळील गलांडे वस्तीजवळ एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. आग भडकल्याने कार काही क्षणात जळून खाक झाली. ही कार पुण्यातील नितीन सिंह राजपूत यांची असल्याचे समोर आले.

सविस्तर माहिती अशी की, राजपूत कुटुंब समृद्धी महामार्गावरुन शिर्डी मार्गे पुण्याला जात होते. वैजापूरच्या गलांडे वस्तीजवळ कार येताच गाडीतून धूर निघत असल्याचे राजपूत यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी गाडीचा वेग कमी करुन कार रस्त्याच्या कडेला उभी केली. खाली उतरून गाडीची पाहणी केली असता गाडीच्या समोरील भागात आग लागल्याचे दिसले.

त्यामुळे त्यांनी तात्काळ गाडीत बसलेल्या कुटुंबातील सदस्यांना बाहेर काढेल. अवघ्या काही मिनिटात आगीचा भडका उडाला आणि संपूर्ण गाडीने पेट घेतला. या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. राजपतू यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची औरंगाबाद ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.