शिक्रापुरात तोंडात बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अपंग कुत्र्याची सुटका करुन मुक्तता करण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाट वस्ती येथे तिन दिवसापासून एक अपंग कुत्रा तोंडात प्लास्टिकची बरणी अडकलेल्या अवस्थेत फिरत होता, याबाबतची माहिती निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेरखान शेख यांना मिळताच शेरखान शेख, सर्पमित्र अमोल कुसाळकर, पशुपक्षी चिकित्सक डॉ. नितीन सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते संतोष काळे, मोहन सासवडे, शुभम माने, विक्की मांढरे, सुजित विरोळे, जयंत सासवडे, बंटी सासवडे यांसह आदींनी सदर ठिकाणी धाव घेत, मोठ्या शिताफीने सदर कुत्र्याला पकडून त्याचा तोंडात अडकलेली बातमी काढून घेतली.

यावेळी पशुपक्षी चिकित्सक डॉ. नितीन सोनवणे यांनी सदर कुत्र्याची तपासणी करत त्याची तातडीने मुक्तता करण्यात आली. दरम्यान तीन दिवसांपासून बरणी अडकलेल्या कुत्र्याची सुटका झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले, तर उन्हाच्या तीव्रतेमुळे पाण्याच्या शोधात कुत्र्याने बरणीत तोंड घातले असावी व कुत्र्याचे तोंड बरणीत अडकले असल्याची शक्यता पशुपक्षी चिकित्सक डॉ. नितीन सोनवणे व सर्पमित्र शेरखान शेख यांनी वर्तवली दरम्यान नागरिकांनी सर्व प्राणिमात्रांचे आभार मानले.