shirur-taluka-logo

ग्रामपंचायतचे २१ लाख थकवून ग्रामपंचायत कारवाईस उदासीन

शिरूर तालुका

वढू बुद्रुक येथील कंपनीच्या प्रदूषणाने नागरिक हैराण

शिक्रापूर: वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील एका कंपनीच्या होणाऱ्या धुराच्या प्रदूषणाचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले असल्यामुळे नागरिकांना अनेक तक्रारी केलेल्या आहेत तर सदर कंपनी कडून ग्रामपंचायतचा २१ लाख रुपयांचा करत थकवला जाऊनही ग्रामपंचायत प्रशासन कारवाईस उदासीन असल्याचे दिसून येत आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील जि आर ग्रुप या कंपनीतून परिसरात मोठ्या प्रमाणात घातक धूर सोडला जात असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, तर येथे होणाऱ्या धुराने नागरिकांच्या आरोग्यासह पशु पक्षांचे जीवन तसेच शेतकऱ्यांची शेतातील पिके धोक्यात आलेली आहेत. याबाबत अनेकदा स्थानिक नागरिकांनी तक्रारी केलेल्या असताना देखील कंपनीवर कोणत्याही प्रकराची कारवाई होत नसल्यामुळे सदर कंपनीला स्थानिक पदाधिकाऱ्यांचे अभय मिळत असल्याचा आरोप काही ग्रामस्थांनी केला आहे.

सध्या कंपनीच्या वाढत्या प्रदूषणाबाबत उमेश महादेव भंडारे यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ पुणे, ग्रामपंचायत वढू बुद्रुक तसेच शिक्रापूर पोलीस स्टेशन कडे लेखी तक्रार करत कारवाईची मागणी केली आहे. तसेच धोकादायक प्रदूषण करणाऱ्या सदर जि आर ग्रुप या कंपनीने ग्रामपंचायतचा तब्बल २१ लाख ४८ हजार रुपये कर थकवला असल्याची माहिती देखील पुढे आलेली असून स्थानिक नागरिकांचा कर थकल्यास ग्रामपंचायत प्रशासन त्यांना दाखले देण्यास टाळाटाळ करते. मात्र सदर कंपनीवर कोणतीही कार्यवाही हा करत नाही याची देखील चौकशी करत सदर कंपनीवर कारवाई करावी यावी, अशी मागणी उमेश भंडारे यांच्यासह परिसरातील १०० ग्रामस्थांनी लेखी निवेदन देत केली आहे.

ग्रामपंचायत मासिक मिटिंग मध्ये निर्णय: शंकर भाकरे (ग्रामविकास अधिकारी)

वढू बुद्रुक मधील सदर कंपनीच्या थकलेल्या एकवीस लाख करापैकी ५ लाखांचे २ चेक कंपनीने दिले असून यापैकी दोन लाख ग्रामपंचायतच्या खात्यात जमा झाले आहे. तसेच कंपनीच्या प्रदूषण तक्रारीबाबत होणाऱ्या मासिक मिटिंग मध्ये निर्णय घेतला जाईल असे ग्रामविकास अधिकारी शंकर भाकरे यांनी सांगितले.

धुराचे प्रमाण सध्या कमी झाले आहे: अंकित शिवले (व्यवस्थापक)
आमच्या कंपनीचा धूर खूप कमी वेळ असतो. सध्या धुराचे प्रमाण सध्या नव्वद टक्के कमी झालेले आहे. ग्रामपंचायत सोबत देखील बोलणे झालेले असून आत्ता होत असलेला धूर काही दिवसात बंद होईल, असे जि आर ग्रुप कंपनीचे व्यवस्थापक अंकित शिवले यांनी सांगितले.