करंदी ग्रामपंचायत इमारतीची नऊ वर्षातच दुरवस्था

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील ग्रामपंचायत इमारतीला नऊ वर्षे पूर्ण झालेले असताना सदर इमारतीची दुरवस्था होऊ लागल्याचे दिसत असल्याने तत्कालीन ठेकेदाराने नित्कृष्ठ दर्जाचे काम केलेले असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

करंदी (ता. शिरुर) येथे सन २०१३ साली ग्रामपंचायत निधी व जिल्हा ग्रामविकास निधी कर्ज निधीतून ग्रामपंचायत इमारत उभारण्यात आली. मात्र सदर इमारतीच्या कामाला दहा वर्षे पूर्ण झालेले नसतानाच सध्या सदर इमारतीच्या छतातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे, तर सध्या इमारतीच्या खालील भागातील पिलर देखील इमारतीतून निखळू लागले आहेत.

सदर इमारतीच्या शेजारीच शाळा तसेच काही व्यावसायिकांचे दुकान असल्याने नागरिकांची नेहमीच येथे वर्दळ असते, त्यामुळे इमारतीचा काही भाग नागरिकांच्या अंगावर पडल्यास अपघात होऊन एखादी दुर्घटना देखील होऊ शकते. त्यामुळे सदर इमारतीच्या कामाची तसेच इमारतीचे बांधकाम झाले त्यावेळी असलेले ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांसह इंजिनियर, ठेकेदार यांची चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी काही नागरिक करु लागले आहे.

इमारतीचे ऑडीट होऊन चौकशी व्हावी; ॲड. कांताराम नप्ते

करंदी गावच्याच्या ग्रामपंचायत इमारतीच्या कामाचे ऑडिट होऊन ज्यावेळी इमारतीचे बांधकाम झाले त्यावेळीचे तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी, ठेकेदार व इंजिनियर यांची चौकशी होऊन त्यावेळी काही भ्रष्टाचार झाला का याची देखील चौकशी व्हावी अशी मागणी ॲड. कांताराम नप्ते यांनी केली आहे.

सदर काम तातडीने दुरुस्त होईल; दिलीप पानसरे

करंदी येथील ग्रामपंचायत इमारतीच्या दुरवस्थेबाबत ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांच्याशी संपर्क साधला असता आमच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची मिटिंग झाली असून इमारतीच्या वर स्लाप वरुन होणारी पाणी गळती तसेच खालील काही दुरुस्तीचे काम ठरवून देण्यात आले आहे व लवकरच काम पूर्ण केले जाईल असे ग्रामविकास अधिकारी दिलीप पानसरे यांनी सांगितले.