कोरेगाव भीमात व्यक्तीचा खून करणारा बँगलोरहून जेरबंद

क्राईम शिरूर तालुका

दीड महिना वेगवेगळ्या राज्यात फिरुन पोलिसांना देत होता गुंगारा

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीचा संशयातून खून करुन फरार होऊन दीड महिन्यापासून फरार असलेल्या आरोपीला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बँगलोरहून जेरबंद केले असून प्रदीप बलराम गराई असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या आरोपीचे नाव आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे २१ जानेवारी २०२३ रोजी सकाळच्या सुमारास सुशांत अनिल करकरमर (वय ४६) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. लाल बाजार, कामगार पागा जि. वकुडा पच्छिम बंगाल या व्यक्तीचा अज्ञात व्यक्तीने खून केल्याचे समोर आले होते. दरम्यान पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, शिवाजी चितारे, नीरज पिसाळ यांसह आदी पोलिसांनी सखोल तपास केला असताना प्रदीप बलराम गराई या इसमाने संशयातून सुशांत करकरमर याचा खून केला असल्याचे निष्पन्न झाले होते. दरम्यान पोलीस प्रदीप गराई याचा शोध घेत असताना प्रदीप हा वारंवार तामिळनाडू, कर्नाटक, आंध्रप्रदेश, चेन्नई, बँगलोर या ठिकाणी लपत होता.

दरम्यान प्रदीप हा बँगलोर मध्ये आला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार अमोल दांडगे, नीरज पिसाळ यांनी बँगलोर येथे जाऊन सापळा लावत प्रदीप बलराम गराई रा. पांचाल ता. सोनमुखी जि. वाकुडा पच्छिम बंगाल सध्या रा. उबाळेनगर वाघोली ता. हवेली जि. पुणे यास ताब्यात घेतलेमा त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने संशयातून सुशांत करकरमर या व्यक्तीचा खून केल्याचे काबुल केले, तर प्रदीप गराई याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 3 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून पुढील पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार व नीरज पिसाळ हे करत आहे.