राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये मलठणच्या यश जामदारचे घवघवीत यश

शिरूर तालुका

शिरुर (अरुणकुमार मोटे): जम्मू काश्मिर येथे (दि. २० ते २१ जून २०२३ रोजी स्टुडण्ड फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

दिल्ली, हरयाणा, पंजाब, कर्नाटक, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश अश्या संपूर्ण भारतातील विविध राज्यातील कुस्तीगीर हे या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये मलठण गावचा सुपुत्र पहिलवान यश गणेश जामदार याने महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व करत ५५ किलो वजनी गटात या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवला होता. यश जामदार याने उत्कृष्ट आणि नेत्रदीपक खेळाचे प्रदर्शन करत यशने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.

यश हा आत्मा मालिक कुस्ती केंद्र, कोकमठाण येथे प. पू. सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या कृपाछत्र छायेखाली सातत्याने दैनंदिन सराव करत आहे. त्यास आत्मा मालिक कुस्ती केंद्राचे संचालक NIS, राष्ट्रीय कुस्ती कोच वस्ताद मा. भरत नायकल (सर) तसेच NIS Qualified कोच विवेक नायकल, कुस्ती कोच राजेंद्र पाटील, कुस्ती कोच अक्षय डांगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. यश ने मिळवलेल्या ह्या अभिमानास्पद कामगिरीबद्दल शिरूर तालुक्यासह पुणे जिल्हयातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.