एकाच मांडवात दोन जुळ्या बहिणींसोबत विवाह युवकाला पडले महागात

महाराष्ट्र

मुंबई: जुळ्या बहिणींसोबत लग्न करणे सोलापुरातील तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या विवाहाची आता महिला आयोगाने दखल घेतली असून याबाबतची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी असे आदेश महिला आयोगाने दिले आहेत. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यांनी याबाबतचे ट्विट देखील केले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल नावाच्या युवकाने शुक्रवारी कांदिवलीतील जुळ्या बहिणींसोबत विवाह केलाय. सोशल मीडियावर या विवाहाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याबाबत एकच चर्चा सुरू झाली. त्यानंतर काल भारतीय दंड संहिता 1860 च्या 494 कलमानुसार अकलूज पोलिस ठाण्यात या विवाहाच्या विरोधात NCR दाखल झाला आहे. याप्रकरणी माळेवाडी येथील राहुल फुले यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. त्यातच आता महिला आयोगाने कारवाईचे आदेश दिल्याने संबंधित युवकाच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

काय म्हटले आहे महिला आयोगाने?

“सोलापूर येथील एका तरुणाने मुंबईतील जुळ्या बहिणींशी एकाच मांडवात लग्न केले आहे. ह्या लग्नाची सोशल मीडियातून सर्वत्र चर्चा सुरू आहे. तसेच माध्यमातून ह्या लग्नाच्या बातम्या सुरु आहेत. भारतीय दंड संहितेच्या कलम 494प्रमाणे हा गुन्हा आहे.तरी सोलापुर पोलिस अधिक्षक आपण उपरोक्त बाबत चौकशी करून त्वरीत कायदेशीर कारवाई करावी. तसेच केलेल्या कारवाई बाबतचा अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग अधिनियम १९९३ चे कलम १२ (१) व १२ (२) अन्वये तात्काळ सादर करावा.”

काय आहे प्रकरण?

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील महाळुंग येथील अतुल याने कांदिवली मधील उच्चशिक्षित पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत शुक्रवारी विवाह केला. अकलूज-वेळापूर रोडवरील गलांडे हॉटेल येथे हा अनोखा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. परंतु, लग्नाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारपासून या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले. एकाच मुलासोबत, एकाच वेळी सख्ख्या बहिणींच्या या आगळ्या वेगळ्या लग्नाची आता सोशल मीडियावर चर्चा होत आहे. परंतु, या विवाहामुळे अतुलच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.