mp sarpanch

पाकिटमारी करणाऱ्या सरपंचाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

देश

भोपाळ (मध्य प्रदेश): बडवानी जिल्ह्यात पोलिसांनी पाकिटमारी करणाऱ्या सरपंच आणि पंचांना अटक केली आहे. सरपंचांची ही टोळी पाकिटमारी करण्यासाठी महागड्या कारमध्ये फिरत असत. पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

सरपंचाने तयार केलेली टोळी महागडी गाडी घेऊन ते गर्दीच्या ठिकाणी जात असत आणि पाकिटमारी करायचे. पोलिसांना आरोपींकडे खिसे कापण्यासाठी वापरले जाणारे ब्लेड, कटर आणि 1 लाख 17 हजार रुपये जप्त केले आहेत. पोलिसांनी आरोपींकडून एक टियागोही जप्त केली आहे, जिचा वापर ते चोरी करताना करत होते. बडवानी पोलिसांनी सर्व आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी धार जिल्ह्याचे आहेत.

बडवानी येथे राजकीय कार्यक्रम, मुख्यमंत्र्यांचा रोड शो तसंच गर्दीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाकिट आणि मोबाईलची चोरी होत असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. तक्रारींचे प्रमाण वाढत असल्याने बडवानी पोलिसांनी या चोरी रोखण्यासाठी आणि गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी एक पथक तयार केले होते. पोलिसांच्या पथकाला एका खबरीकडून कुक्षी हाट बाजारात काही पाकिटचोर दिसल्याची माहिती मिळाली होती.

पोलिसांचं पथक कुक्षी हाट बाजारात पोहोचलं आणि चार तरुणांना घेराव घालत ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपींची चौकशी करता आणि तपासणी केली असता त्यांच्याकडे ब्लेड, कटर आणि चाव्या सापडल्या आहेत. चौकशीदरम्यान आरोपींनी मुख्यमंत्र्यांच्या सभेत आणि रोड शोमध्ये पाकिटमारी केल्याचा गुन्हा कबूल केला. तसेच 1 लाख 17 हजारांच्या रोख रुपयांसह एक टियागो कारही जप्त केली आहे.

कोतवाली पोलीस ठाण्याचे प्रभारी सोनू शितोले यांनी सांगितले की, पकडलेल्या आरोपींची ओळख पटली आहे. यामध्ये धार जिल्ह्याच्या देवधा येथील रहिवासी सुभान भूरिया याचा समावेश आहे. सुभान भूरिया हा देवधा गावचा सरपंच आहे. सुभान भूरिया याच्यासह त्याचे वडील बेडिया भुरिया (वय 40), मोहन सिंह चौहान (वय 25), भारतसिंह बामनिया (वय 24) यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांची कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान गावचा सरपंच आणि पंच चोरीत सहभागी असल्याची माहिती समोर आल्यानंतर गावात खळबळ उडाली आहे.