मुखई आश्रम शाळेच्या मुलांची राष्ट्रीय बेसबॉल स्पर्धेसाठी निवड

शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळा या शाळेच्या खेळाडूंनी जिल्हा स्तरावर पार पडलेल्या बेसबॉल स्पर्धेत यश मिळविले असल्याने या खेळाडूंची नुकतीच दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असल्याची माहिती मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे यांनी दिली आहे.

मुखई (ता. शिरुर) येथील कै. रा. गे. पलांडे प्राथमिक आश्रम शाळेतील राज चाटे, स्वप्नील दौंड, सुधीर जाधव, स्वप्नील बांगर, उत्कर्ष निलख, परसराम मिसाळ, अविनाश डोळे, प्रथमेश शिरसाट या खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा स्तरित स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी राज चाटे, स्वप्नील दौंड, सुधीर जाधव, स्वप्नील बांगर या चौघा खेळाडूंची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील बेसबॉल स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

सर्व खेळाडूंनी शाळेमध्ये उपलब्ध असलेल्या खेळाच्या साहित्यांच्या माध्यमातून शुभम मुळे यांसह आदी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव केला होता, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचा संस्थेच्या अध्यक्षा जयश्री पलांडे, अशोकराव पलांडे, प्राचार्य तुकाराम शिरसाट, मुख्याध्यापक सुधीर ढमढेरे, महेश शिरसाट यांसह आदींच्या हस्ते सन्मान करत गौरव करण्यात आला.