शिरुर तालुक्यात अज्ञात कारणातून परप्रांतियाचा खून

क्राईम मुख्य बातम्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) वढू बुद्रुक रोड लगत अज्ञात कारणातून सुशांत अनिल करकरमर या परप्रांतिय इसमाचा धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथील वढू रोड लगत खराडे बिल्डींग मध्ये रफिक पठाण यांच्या खोलीत राहणारा सुशांत करकरमर हा व्यक्ती घरात झोपलेला असताना (दि. 21) रोजी पहाटे साडेपाच च्या सुमारास एक व्यक्ती दुचाकीहून त्यांच्या घरी आला त्याने दरवाजा वाजवून सुशांत यांच्या घरात जाऊन सुशांतच्या पोटावर, डोक्यावर धारदार शस्त्राने वार केले आणि पळून गेला.

दरम्यान सुशांत ओरडत घराबाहेर आले आणि दारात रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी शेजारील भाडेकरु बाहेर आले असता सुशांत करकर मर शांत पडल्याचे दिसले. घटनेची माहिती मिळताच शिरुर उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अविनाश थोरात, जितेंद्र पानसरे, पोलीस हवालदार चंद्रकांत काळे, सचिन होळकर, श्रीमंत होनमाने, शिवाजी चितारे, अमोल दांडगे, निखील रावडे, किशोर शिवणकर, विकास पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक तुषार पंधारे, जनार्दन शेळके, योगेश नागरगोजे, राजू मोमीन यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन साठी पाठवून दिला तर घटनास्थळी पोलिसांना एक धारदार चाकू मिळून आला.

मात्र खून करणाऱ्या व्यक्तीचे नाव तसेच खुनाचे कारण अद्याप समजू शकले नाही, तर यामध्ये सुशांत अनिलकरकरमर (वय ४६) रा. तुळजाभवानी नगर कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे मूळ रा. लाल बाजार कामगार पागा जि. बकुडा राज्य पच्छिम बंगाल या व्यक्तीचा खून झाला असून घडलेल्या प्रकाराबाबत शहाजान जहांगीर इनामदार (वय ४५) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन अतकरे हे करत आहे.