Video: करडे गावात शेवटच्या श्रावण सोमवारी चक्क अवतरले नागराज…

इतर शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील करडे गावात (दि 22) शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरासमोर असणाऱ्या झुलत्या मनोऱ्याच्या बाजुलाच असणाऱ्या शंकराच्या पिंडीजवळ दुपारी 4 च्या सुमारास मुख्य पुजारी गणेश नामदेव श्रीमंत यांना पहिल्यांदा नागराजांनी दर्शन दिले. करडे येथे भैरवनाथाचे मोठे मंदिर असुन या मंदिरासमोर प्राचीन झुलता मनोरा आहे. या मनोऱ्याच्या बाजुला महादेवाची पिंड आणि नंदी आहे. त्या पिंडीजवळ हे नागराज बसले होते. पुजाऱ्यांनी नागाला पाहताच त्याचा मोबाईलमध्ये व्हिडीओ काढुन स्वतःच्या व्हाट्स अँप स्टेटसला ठेवला.

त्यानंतर ते आपल्या कामात व्यस्त झाले. गावातील लोकांनी पुजाऱ्याच व्हाट्स अँप स्टेटस पाहिल्यानंतर अनेक ग्रामस्थांनी स्वतःच्या मोबाईल स्टेटसला या नागाचे व्हिडीओ ठेवले त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाला. अनेकांनी त्या नागाला पाहण्यासाठी मंदिराच्या परीसरात गर्दी केली. परंतु काही वेळाने हे नागराज मंदिराच्या परिसरात दिसेनासे झाले. रोज सायंकाळी सात वाजता भैरवनाथ मंदिरात आरती असते गावातले अनेक भाविक यावेळी मंदिरात येत असतात. त्यावेळी सायंकाळी आरतीच्या वेळेस हे नागराज पुन्हा मंदिरात आले. यावेळी उपस्थित काही महिला भगिनींनी त्यांचे मनोभावे दर्शन घेतले आणि फोटो आणि व्हिडीओ काढुन सोशल मीडियावर टाकले. सध्या शिरुर तालुक्यात सगळीकडे सोशल मीडियावर या नागराजांचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.