शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक

क्राईम शिरूर तालुका

शिक्रापूर (शेरखान शेख): निर्वी (ता. शिरुर) येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस खरेदी करुन शेतकऱ्याच्या उसाचे तब्बल 12 लाख 25 हजार रुपये शेतकऱ्यांना न देता फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे आशिष शांताराम साठे व नवनाथ सुभाष झेंडे या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

निर्वी (ता. शिरुर) येथील चंद्रकांत सोनवणे यांच्या सह काही शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतात उसाचे पिक घेतलेले असताना जून २०२२ मध्ये आशिष साठे व नवनाथ झंडे यांनी आम्ही शेतातून ऊस विकत घेतो त्यांनतर तुम्हाला 15 दिवसांनी पैसे देतो असे म्हणून सोनवणे यांच्यासह शेजारील काही शेतकऱ्यांचा ऊस विकत घेतला. सर्व शेतकऱ्यांचा मिळून तब्बल 502 टन ऊस या दोघांनी विकत घेतला. मात्र त्यांनतर अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना त्यांचे पैसे न देता, पैसे देण्यास टाळाटाळ करुन शेतकऱ्यांची तब्बल 12 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली.

याबाबत चंद्रकांत दौलत सोनवणे (वय ५२) रा. निर्वी (ता. शिरुर) जि. पुणे यांनी शिरुर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने शिरुर पोलिसांनी आशिष शांताराम साठे रा. नागरगाव (ता. शिरुर) जि. पुणे व नवनाथ सुभाष झेंडे रा. चिखली ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर या दोघांवर गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप यादव हे करत आहे.