तळेगाव ढमढेरेतील धोकादायक बंधाऱ्याची प्रशासनाकडून पाहणी

शिरूर तालुका

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याची तसेच संरक्षक कठड्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून सदर ठिकाणी दुरुस्तीची मागणी नागरिक करत असताना प्रशासनाकडून नुकतीच येथील धोकादायक बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली आहे.

तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील भैरवनाथ नगर जवळील वेळनदीवरील बंधाऱ्याची मोठी दुरावस्था झाली होती. या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाच्या वतीने उपविभागीय शाखा अभियंता श्रीकांत राऊत यांनी नुकतीच पाहणी केली. यावेळी उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ, सामाजिक कार्यकर्ते भरत भुजबळ व ग्रामस्थ उपस्थित होते. या बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूचे लोखंडी संरक्षक कठडे गेल्या वर्षी पुरात वाहून गेल्याने या बंधाऱ्यावरुन विद्यार्थी व नागरिक धोकादायक प्रवास करत आहे. त्यामुळे बंधारा लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे परिसरातील शाळा, विद्यालय तसेच महेंद्र भुजबळ यांनी केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणी पुरवठा योजनेंतर्गत सन १९९८ च्या दरम्यान तयार करण्यात आल्याने या विभागाला बंधारा दुरुस्तीबाबत पत्रव्यवहार केला असता या बंधाऱ्याची पाहणी करण्यात आली.

unique international school
unique international school

सदर बंधारा हा पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हि योजना राबविण्यासाठी बांधण्यात आला असून देखभाल दुरुस्तीसाठी बंधाऱ्यासहित ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे यांच्याकडे हस्तांतरित करण्यात आला आहे व हा बंधारा दुरुस्तीच्या कामगारांसाठी फ्लेट टाकणे, काढणे यासाठी असून स्थानिक नागरिकांच्या येण्या जाण्यासाठी नाही. त्यामुळे कोणतीही दुर्घटना किंवा जीवित हानी टाळण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

हा बंधारा लोकवाहतुकीसाठी नसून पाणी साठविण्यासाठी तयार केला आहे. देखभाल दुरुस्त करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा पादचारी मार्ग आहे. ग्रामपंचायतच्या मागणीनुसार दुरुस्तीचे अंदाजपत्रक लवकरात लवकर ग्रामपंचायत प्रशासनास देणार असून पुढील कार्यवाही स्थानिक प्रशासन करेल, असे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण उपविभागचे उपविभागीय अभियंता श्रीकांत राऊत यांनी सांगितले.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून अंदाजपत्रक प्राप्त झाल्यानंतर ग्रामपंचायतच्या ग्रामनिधीतून तातडीने बंधारा दुरुस्त केला जाईल असे तळेगाव ढमढेरेच्या सरपंच अंकिता भुजबळ यांनी सांगितले.

भैरवनाथ नगरचा बंधारा लोक वाहतुकीसाठी नसल्याबाबतचे पत्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने दिल्याने या भागातील नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बंधारा नजीकच वाहतुकीसाठी ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जिल्हा परिषद, आमदार फंड किंवा इतर विभागातून नवीन पुलासाठी निधी मिळावा यासाठी मागणी व पत्रव्यवहार करणार असल्याचे उपसरपंच मच्छिंद्र भुजबळ यांनी सांगितले.