वढू बुद्रुकच्या शिक्षकाचा कारेगावमध्ये अपघाती मृत्यू

मुख्य बातम्या शिरूर तालुका

सत्तावीस वर्षे शिक्षण देणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूने गाव हळहळले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यातील एका शाळकरी विद्यार्थ्याचा वाहनाला धडकून मृत्यू झाल्याची घटना काल घडलेली असताना सकाळच्या सुमारास वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाच्या शिक्षकाचा पुणेनगर महामार्गावर कारेगाव नजीक अपघाती मृत्यू झाला असून संजय सिताराम कदम असे मयत झालेल्या शिक्षकाचे नाव असून गावात 27 वर्षे ज्ञानदानाचे काम करणाऱ्या शिक्षकाच्या मृत्यूने विद्यार्थ्यांसह गाव हळहळले आहे.

वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय कदम हे आज सकाळच्या सुमारास त्यांच्या ताब्यातील एम एच १२ एल जि ७८५१ दुचाकीहून वाडेगव्हाण येथे जात असताना कारेगाव नजीक त्यांना फोन आल्याने ते दुचाकी रस्त्याचे कडेला घेऊन फोनवर बोलत असताना पाठीमागून 2 ट्रेलर घेऊन भरधाव वेगाने आलेल्या ट्रॅक्टरची कदम यांना धडक बसल्याने कदम रस्त्याचे कडेला पडले व पाठीमागून आलेल्या ट्रॅक्टरचे चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने संजय कदम जखमी झाले. त्यांना उपचारासाठी शिरुर येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर अपघातात संजय सीताराम कदम (वय ४५) रा. पाबळ चौक शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. वाडेगव्हाण ता. पारनेर जि. अहमदनगर यांचा मृत्यू झाला असून याबाबत राजेंद्र बाळासाहेब धुमाळ (वय ४३) रा. पिंपळे खालसा (ता. शिरुर) जि. पुणे यांनी रांजणगाव एमआयडीसि पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली असल्याने रांजणगाव पोलिसांनी ट्रॅक्टर चालक महेश किसन चव्हाण रा. उंबरखेडा ता. कन्नड जि. अहमदनगर याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संतोष पवार हे करत आहे.

शिस्तबद्ध शिक्षकाचा शिस्तीतून मृत्यू…

वढू बुद्रुक येथील शरदचंद्रजी पवार माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक संजय कदम हे अतिशय शिस्तबद्ध तसेच मनमिळावू होते, ते पुणे नगर रस्त्याने दुचाकीहून जात असताना त्यांच्या मोबाईलवर फोन आल्याने ते वाहतुकीचे नियम पाळून शिस्तीने रस्त्याचे कडेला उभे राहून, हेल्मेट काढून शिस्तीने मोबाईलवर बोलत असताना त्यांचा अपघात होऊन मृत्यू झाला. त्यामुळे शिस्तबद्ध शिक्षकाचा शिस्तीतून मृत्यू झाला असल्याची भावना अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केली.