शिरूरला तहसिलदार दया, नाहीतर बेमुदत उपोषण आमदार अशोक पवार आक्रमक 

मुख्य बातम्या

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर तहसिल कार्यालयात कायमस्वरुपी तहसिलदार नसल्याने नागरीक वर्षभर वारंवार हेलपाटे घालून त्रस्त झाले आहेत. शिरुर तहसिल कार्यालयात गेल्या वर्षाहून अधिक काळ प्रभारी तहसिलदार असल्याने नागरीकांची अनेक कामे खोळांबली आहे. प्रभारी तहसिलदारांना दुसरीकडचा चार्ज असल्याने शिरुरकडे पुरेसा वेळ मिळत नसल्याचे दिसून येत आहे. नवीन तहसिलदार आणण्याबाबत राजकिय पदाधिकारी यांना वेळ नाही का…? नागरीक बऱ्याच दिवसापासून त्यांची कामे मार्गी न लागल्याने प्रमाणात त्रस्त झाले असुन याबाबत राजकीय अनास्था कारणीभूत असल्याची चर्चा तालुक्यात होत असताना आमदार अशोक पवार यांनी 30 जानेवारी पर्यंत पुर्ण वेळ तहसिलदारांची नियुक्ती न झाल्यास आमरण उपोषण करणार आहेत. गेल्या वर्षभर सर्वसामान्य नागरीकांचे हाल होत असताना आमदार वर्षभर करत होते याचा प्रश्न शिरूर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला पडला आहे.

गेल्या वर्षभराहून अधिक काळ, शिरूर तालुक्याचा कारभार प्रभारी तहसिलदारांमार्फत चालविला जात असताना आणि याबाबत आता सर्वपक्षीय पातळीवर निवेदन देणे सुरू झाले असतानाच आमदार ॲड. अशोक पवार यांनी या विषयात उडी घेत, शिरूर तालुक्यासाठी येत्या 30 जानेवारीपूर्वी पूर्ण वेळ तहसिलदारपद भरले न गेल्यास आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. परंतु राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मात्र आमदार पवार यांनी याबाबत निर्णय का घेतला नाही हे सर्वसामान्य लोकांना पडलेलं कोडंच आहे.

राज्यातील सत्ताबदलानंतर, प्रशासकीय घडी विस्कटली असून, या प्रशासकीय गलथान व्यवस्थेस शिंदे – फडणवीस सरकार जबाबदार असल्याचा आरोप आमदार अशोक पवार यांनी केला आहे. शिरुर तालुक्यात प्रभारी तहसिलदारामार्फत कारभार चालविला जात असल्याने गेल्या सहा महिन्यांहून अधिक काळ महसूल खात्याशी संबंधित अनेक कामे रखडली आहेत. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन कामासाठी तहसिल कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. सामान्य माणसाच्या दैनंदिन कामकाजातही मोठी अडवणूक होत आहे. गोरगरीब जनता, शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, उद्योजक व व्यावसायिकवर्ग शासकीय दाखले व इतर कागदपत्रांसाठी तहसिलदार कार्यालयात येतो. पण येथे आल्यावर एकतर तहसिलदार नाही किंवा असले तरी प्रभारी असल्याने धोरणात्मक कामकाजांकडे ते कानाडोळा करतात, अशा असंख्य तक्रारी आपल्याकडे प्राप्त झाल्या असल्याचे आमदारांनी सांगितले.

तीन ते चार लाख लोकसंख्येच्या आणि कृषी व औद्योगिक क्षेत्रात लौकीक असलेल्या शिरूर तालुक्यावर हा अन्याय करण्यामागे नेमके काय गुपित आहे. राज्यस्तरीय सत्ताधाऱ्यांकडून जाणीवपूर्वक शिरुरवर अन्याय केला जातो आहे का, असा सवाल करत तहसिलदार या प्रशासकीय प्रमुखाअभावी तालुक्यातील प्रशासकीय कामकाज ठप्प झाले असताना आणि याबाबत शासनाकडे वारंवार मागणी करूनही दखल घेतली जात नसल्याने आपण 30 जानेवारीपर्यंत वाट पाहणार. त्या कालावधीत कायमस्वरूपी, पूर्ण वेळ तहसिलदारपद न भरल्यास तहसिलदार कार्यालयापूढे आमरण उपोषण सुरू करणार असल्याचे आमदार ॲड. अशोक पवार यांनी सांगितले.