मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने संजय पाचंगे यांनी फुंकले विधानसभेचे रणसिंग?

भाजपसह सर्वच राजकीय पक्षांच्या गोटात चर्चांना उधाण

संजय पाचंगे आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या उपस्थितीत झालेली भेट राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढवणारी असून शिरुर तालुक्यात याबाबतही चर्चा झडत आहे.

शिरुर: शिरुर-हवेलीत भाजपचा विधानसभेत झालेला पराभव आणि माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या नंतर पक्षात धाडसी नेत्रुत्वाची असलेली कमतरता, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा झंझावात रोखणार कोण? अशी परिस्थिती शिरुर तालुक्यात निर्माण झाली होती. पुर्व भागातील भाजपच्या अनेकांनी राष्ट्रवादीचा रस्ता धरला. परंतु, अनेक सामाजिक प्रश्न आंदोलनाच्या माध्यमातून सोडवून, टोल सारखे यशस्वी राज्यव्यापी आंदोलन करुन आपला एक वेगळा ठसा उमटवणारे संजय पाचंगे यांनी भाजपमधे प्रवेश केला. त्यानंतर पक्षाने त्यांना उद्योग आघाडी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. पाचंगे यांनी भाजपची वाट धरताच घोडगंगा सहकारी साखर कारखाना, शिरुर बस स्थानक, पंचायत समिती अशा अनेक बाबतीत अभ्यास पुर्ण व आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.

कोरोनाच्या काळात पाचंगे यांनी तालुका पिंजून काढला. त्यामुळे कोविड रुग्णांना पुरेशा वैद्यकीय सुविधा व उत्तम जेवणाची सोय झाल्यामुळे नागरिकांमध्ये वेगळीच चर्चा रंगली होती. गृहमंत्र्यांच्या मतदारसंघात असणाऱ्या पाबळ येथील उपजिल्हा रुग्णालयातील ४० ऑक्सिजन बेड बंद होते. अवघ्या ८ दिवसात शासनाला ते सुरु करण्यास पाचंगे यांनी भाग पाडले. काही दिवसांपूर्वी तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रातील नवीन इमारत बांधुन धुळखात पडलेली असताना प्रशासनाला धारेवर धरत ती सुरु करण्यास भाग पाडली. त्यामुळे शिरुर तालुक्यात भाजपला एक आक्रमक, धाडसी आणि अभ्यासु चेहरा मिळाल्याने कार्यकर्त्यांमधेही उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. अशातच संजय पाचंगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नुकत्याच घेतलेल्या कार्यक्रमात निमंत्रण पत्रिकेवर भाजपाच्या नव्या जुन्या पदाधिकाऱ्यांची नावे टाकत त्यांच्यात मेळ घालण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्याला सर्वच भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित राहुन प्रतिसाद दिला. 

बाबुराव पाचर्णे यांच्या नंतर जुन्या नव्या सर्वच पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन काम करताना कार्यक्रमाला निमंत्रण देत गर्दी जमवली. त्यामुळे पाचंगे यांनी या माध्यमातून आगामी विधानसभेचे रणसिंग फुंकले असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. या कार्यक्रमात सुरेश थोरात, शिवाजीराव भुजबळ, तालुकाध्यक्ष दादा पाटील फराटे , सुदर्शन चौधरी, गणेश ताठे वक्त्यांनी जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्याकडे पाचंगे यांना ताकद देण्याची जाहीर मागणीही केली. जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनीही आपल्या भाषणात पाचंगे यांना बळ देणार असल्याचे सांगितले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस व शिरुरचे प्रभारी सुदर्शन चौधरी यांनी तर शिरुर नगरपरिषदेची जबाबदारी संजय पाचंगे यांच्याकडे देण्याची जाहीर मागणी केली.

किरीट सोमय्या आणि संजय पाचंगे यांच्या भेटीनंतर चर्चेला उधान...

संजय पाचंगे आणि भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची माजी मंत्री बाळासाहेब भेगडे यांच्या उपस्थितीत झालेली भेट राष्ट्रवादीच्या गोटात चिंता वाढवणारी असून शिरुर तालुक्यात याबाबतही चर्चा झडत आहे. एकूणच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पाचंगे यांनी आपल्या विधानसभेचे रणसिंग फुंकले असल्याची चर्चा रंगत असून, याबाबत माजी आमदार बाबुराव पाचर्णे  हे उद्योग आघाडी पूणे जिल्हा चे जिल्हाध्यक्ष संजय पाचंगे यांना आपला राजकीय वारसदार म्हणून साथ देतात का?  हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महत्त्वाच्या घडामोडी मोबाईलवर मिळवण्यासाठी 95118 27050 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍप ग्रुपवर ऍड करा अथवा ग्रुप जाईन करा.

Title: shirur taluka politics news bjp sanjay pachange vidhansabha