घरच्या घरी करा वटपौर्णिमा व्रतपूजन; पाहा शुभ मुहूर्त

सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमा व्रताला सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे.

ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाचे ओळखली जाते. सावित्रीने यमदेवांकडून आपल्या पतीचे प्राण परत आणले होते. ही घटना ज्येष्ठ पौर्णिमेला घडली. तेव्हापासून पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावे, यासाठी सुवासिनी महिला पौर्णिमेच्या दिवशी सावित्रीसारखे व्रत आचरतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली. तेथेच यमदेवांनी सत्यवानाला त्याचे आयुष्य परत दिले. त्यामुळे वडाच्या झाडाचे पूजन केले जाते. यंदाच्या वर्षी गुरुवार, २४ जून रोजी वटपौर्णिमा आहे. वास्तविक पाहता वटसावित्रीचे व्रत तीन दिवसांचे असते. मात्र, ज्यांना तीन दिवसीय व्रत करणे शक्य नाही, त्यांनी वटपौर्णिमेच्या दिवशी हे व्रत विधिपूर्वक आचरावे, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

वटपौर्णिमा: २४ जून २०२१

पौर्णिमा प्रारंभ: २३ जून २०२१ रोजी उत्तररात्रौ ०३ वाजून ३२ मिनिटे.

पौर्णिमा समाप्ती: २४ जून २०२१ रोजी उत्तररात्रौ १२ वाजून ९ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे वटपौर्णिमेचे व्रतपूजन २४ जून रोजी करावे. तसेच संपूर्ण दिवस पौर्णिमा असल्यामुळे आपापले कुळाचार, कुळधर्म पाळून वटसावित्री व्रताचा संकल्प करून वडपूजन करावे, असे सांगितले जात आहे. यंदाच्या वर्षीही कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे घरच्या घरी हे व्रताचरण करावे, असे आवाहन केले जात आहे.

वटपौर्णिमा व्रतपूजन कसे करावे?
ज्येष्ठ पौर्णिमेला वटसावित्रीचे व्रत सुवासिनी महिलांकडून केले जाते. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीनेही वडाचे महत्त्व विशेष असल्याने त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे हाही पूजेचा एक हेतू आहे. प्रत्यक्ष वडाच्या झाडाची पूजा करणे शक्य नसल्यास वडाच्या झाडाची प्रतिमा घ्यावी. एका चौरंगावर तिची स्थापना करावी. व्रताचरणाचा संकल्प करावा. त्यानंतर देवतांचे आवाहन करावे. तुप, दूध, मध, दही आणि साखर यांचे मिश्रण असलेले पंचामृत अर्पण करावे. त्यानंतर शुद्ध पाणी अर्पण करावे. हळद-कुंकू, फुले, फळे अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य अर्पण करावा. आरती करावी. मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसाद वाटावा. पूजन झाल्यावर,

सावित्रि ब्रह्मसावित्रि सर्वदा प्रियभाषिणी|
तेन सत्येन मां पाहि दुःख-संसार-सागरात्|
अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते |
अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि ||

अशी सावित्रीची प्रार्थना करावी. यानंतर,

वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दन:। वटाग्रे तु शिवो देव: सावित्री वटसंश्रिता ।।

असे म्हणून नामस्मरण करावे. दिवसभर उपास करावा, असे सांगितले जाते.

वटसावित्री आरती

अश्वपती पुसता झाला।। नारद सागंताती तयाला।।
अल्पायुषी सत्यवंत।। सावित्री ने कां प्रणीला।।
आणखी वर वरी बाळे।। मनी निश्चय जो केला।।
आरती वडराजा।।१।।

दयावंत यमदूजा। सत्यवंत ही सावित्री।
भावे करीन मी पूजा। आरती वडराजा ।।धृ।।
ज्येष्ठमास त्रयोदशी। करिती पूजन वडाशी ।।
त्रिरात व्रत करूनीया। जिंकी तू सत्यवंताशी।।
आरती वडराजा ।।२।।

स्वर्गावारी जाऊनिया। अग्निखांब कचळीला।।
धर्मराजा उचकला। हत्या घालिल जीवाला।
येश्र गे पतिव्रते। पती नेई गे आपुला।।
आरती वडराजा ।।३।।

जाऊनिया यमापाशी। मागतसे आपुला पती।।
चारी वर देऊनिया। दयावंता द्यावा पती।।
आरती वडराजा ।।४।।

पतिव्रते तुझी कीर्ती। ऐकुनि ज्या नारी।।
तुझे व्रत आचरती। तुझी भुवने पावती।।
आरती वडराजा ।।५।।

पतिव्रते तुझी स्तुती। त्रिभुवनी ज्या करिती।।
स्वर्गी पुष्पवृष्टी करूनिया। आणिलासी आपुला पती।।
अभय देऊनिया। पतिव्रते तारी त्यासी।।
आरती वडराजा ।।६।।

वडाच्या झाडाला सात फेऱ्या का मारतात ...
सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी यमलोक गाठलं आणि तेव्हापासून सर्व सुवासिनींनी वटपौर्णिमा व्रताला सुरुवात केली असं म्हटलं जातं. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं असा समज आहे. वडाच्या झाडाला सात फेऱ्या मारून आणि त्याची पूजा करून हे व्रत करण्यात येतं. सावित्रीने यमदेवाकडून आपला पती सत्यवानाचे प्राण याच दिवशी परत आणले. त्यामुळे सुवासिनींसाठी हा उपवास अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. ही घटना ज्यादिवशी घडली त्यादिवशी पौर्णिमा होती. त्या दिवसापासून सुवासिनी महिला या पौर्णिमेच्या दिवशी पतीच्या प्राणांचे रक्षण व्हावे आणि आपल्या पतीला सत्यवानाप्रमाणे दीर्घायुष्य लाभावे यासाठी हे व्रत करतात. सावित्रीने आपल्या पतीची सेवा वडाच्या झाडाखाली केली आणि यमदेवाने तिथेच सत्यवानाला त्याचे प्राण परत दिले असा समज आहे. त्यामुळे वडाच्या झाडाच्या पूजन केले जाते. ज्येष्ठ पौर्णिमा ही वटपौर्णिमा नावाने ओळखली जाते. खरं तर हे व्रत तीन दिवसांचे असते. पण हल्ली केवळ महिला वटपौर्णिमेच्या दिवशी उपवास करून हे व्रत करतात.

पौराणिक कथेनुसार, भद्र नामक देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री अतिशय सुंदर, नम्र व गुणी मुलगी होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याच्या धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा पुत्र होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासह राजा जंगलात राहत होता. भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहिती होते. त्यामुळे सत्यवानाशी विवाह न करण्याचा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही. तिने सत्यवानाशी विवाह केला आणि जंगलात नवऱ्याबरोबर राहून सासू सासऱ्याची सेवा करू लागली. सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभ केले.

सत्यवानाच्या मृत्यूच्या दिवशी सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता, सावित्री त्याच्याबरोबर गेली. लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला. यमराज तिथे आले आणि सत्यवानाचे प्राण नेऊ लागले. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने या गोष्टीसाठी नकार दिला आणि आपल्या पतीसह जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासऱ्यांचे डोळे व राज्य परत मागितले. तिसरे वरदान मागताना, मला पुत्रप्राप्ती होऊन सत्यवानाची वंशवृद्धी व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. यमराजाने तथास्तु असे म्हटले आणि त्याला सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले. म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला महिला वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात.

Title: Vat Purnima 2021 Shubh Muhurat Puja Vidhi And Importance