सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवून घातला फुलांचा हार...

सरपंचाच्या कृत्याचा निषेध केला आहे. कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई (बीड): मोरेवाडी (ता. अंबाजोगाई) गावातील काही नागरिकांनी एका कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवून त्याला हार घातल्याची घटना घडली आहे. तसेच कुत्र्याचा डोक्याला टिळा लावून अनोख्या पद्धतीने निषेध केला आहे. गेल्या जवळपास दोन वर्षांपासून सरपंचबाई आपल्या कार्यालयात फिरकल्या नसल्याने गावकऱ्यांनी, सरपंचाच्या कृत्याचा निषेध केला आहे. कुत्र्याला सरपंचाच्या खुर्चीवर बसवल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.

मोरेवाडी येथील महिला सरपंच गेल्या दोन वर्षांपासून गैरहजर असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. याचा निषेध म्हणून त्यांनी मंगळवारी (ता. 12) सरपंचाच्या खुर्चीवर कुत्र्याला बसवले होते. कुत्र्यांला फुलांचा हार घालून टिळा देखील लावला होता. यानंतर संतप्त नागरिकांनी सरपंचबाईंनी ग्रामपंचायतीत हजर राहावे, अशी मागणी केली आहे. याबाबत त्यांनी एक निवेदन देखील दिले आहे.

निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले की, 'मारेवाडीतील महिला सरपंच गेल्या दोन वर्षांपासून ग्रामपंचायतीत आल्या नाहीत. त्या केवळ झेंडावंदन आणि सार्वजनिक उत्सवासाठीच ग्रामपंचायत कार्यालयात येतात. इतर सर्व कामे त्या आपल्या घरातूनच करतात. गावकऱ्यांनी अनेकदा विनंती करूनही त्या कार्यालयात येत नाहीत. तसेच त्यांनी गेल्या काही काळापासून मासिक सभा आणि ग्रामसभा देखील घेतली नाही.'

Title: villagers put dog on sarpanchs chair and put garland of flow